News Flash

जलसेवकांना दिलासा!

जलसेवकांचे स्थान अधोरेखित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

वर्धा जिल्ह्य़ातील जलसंधारणाच्या कामाची पाहणी करताना डॉ. राजेंद्र सिंह व अन्य.

अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची डॉ. राजेंद्र सिंह यांची ग्वाही

राज्य शासन पुरस्कृत जलसाक्षरता अभियानात स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या जलसेवकांचीच अडचण होत असल्याची भावना या अभियानाचे मार्गदर्शक असलेले प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मान्य केली आहे. जलसेवकांचे स्थान अधोरेखित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यामुळे जलसेवकांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.

राज्य शासनाने २०१६ साली हे अभियान पुरस्कृत केले. राज्य, विभागीय व जिल्हा पातळीवर अनुक्रमे जलनायक, जलयोद्धा व जलसेवकांची नेमणूक झाली. हे सर्व साडेचार हजारांवर स्वयंसेवक अभियानाशी जोडले जाऊनही ‘उपेक्षित’ असल्याची भावना व्यक्त झाली होती. त्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये २१ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच अभियानाचे मार्गदर्शक म्हणून सेवा देणारे प्रा. राजेंद्र सिंह यांनी २३ फेब्रुवारीस बैठक बोलावली. येथील गांधी विचार परिषदेत झालेल्या या बैठकीत सांगली, पुणे, औरंगाबाद व अन्य

जिल्ह्य़ांतील निवडक जलनायक उपस्थित होते. या वेळी बोलताना राजेंद्र सिंह यांनी जलसेवकांच्या भावना माध्यमांतून कळल्यावर अस्वस्थ झाल्याचे प्रारंभीच नमूद केले. आपण शासनाचे विरोधक नाही. सहकार्याच्या भावनेतून काम करीत आहोत. जलसाक्षरतेच्या कार्यात वेग नाही. परिणामी, जलसेवकांचा उत्साह मावळतो. त्यांचे अस्तित्व मान्य झालेच पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

शासनाच्या अधिकाऱ्यांचेच धोरण उदासीनतेचे असताना कार्यकर्ते कसे काम करणार, असा सवाल जलनायक माधव कोटस्थाने यांनी या वेळी उपस्थित केला. त्यावर मी स्वत: याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. किमान जलयुक्त शिवार योजनेच्या जिल्हास्तरीय समित्यांवर या जलसेवकांना स्थान मिळायला हवे. त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असेही शासनास सांगणार असल्याचे राजेंद्र सिंह यांनी बैठकीत स्पष्ट केले.

देशातील पहिले जलसाक्षरता केंद्र महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. पुणे येथील ‘यशदा’ परिसरात मुख्य केंद्र असून उर्वरित ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. राजेंद्र सिंह यांची अशा केंद्रांच्या आवश्यकतेबाबत मत व्यक्त केले होते. पाण्याचे नियोजन व संधारण करण्याच्या हेतूने तसेच जलसंकटाची जाणीव ग्रामपातळीवर करून देण्यासाठी केंद्र कार्यरत झाले. पण स्वयंसेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुढे भ्रमनिरास होत गेला. जलसंपदा, कृषी व जलसंधारण अशा तीन खात्यांशी निगडित केंद्र आहे. परंतु विसंवादाने उपक्रमच विस्कळीत होत असल्याची भावना स्वयंसेवक व्यक्त करू लागले आहेत. मात्र आता राजेंद्र सिंह यांनी त्यात लक्ष घातल्याने किमान काही बदल होण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:25 am

Web Title: water literacy campaign dr rajendra singh
Next Stories
1 १५ लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडून पत्नीला सामूहिक बलात्काराची धमकी
2 मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा औरंगाबादमध्ये निषेध
3 कचराकोंडीवरून औरंगाबाद महापालिकेचा तेरावा घालणार नागरिक
Just Now!
X