24 January 2020

News Flash

दूषित पाण्यामुळे पोटाच्या आजारांत वाढ

जळगावमध्ये तहानलेल्या गावांची जलदुर्भिक्ष आणि विकारांशी लढाई

|| जितेंद्र पाटील

जळगावमध्ये तहानलेल्या गावांची जलदुर्भिक्ष आणि विकारांशी लढाई

पाण्याच्या अभावामुळे गावोगावच्या नागरिकांची नुसती वणवण वाढली नाही, तर त्यांना सेवनासाठी शेवटचा पर्याय म्हणून उपलब्ध होणाऱ्या दूषित वा क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्याला अपाय करणाऱ्या आजारांनी डोके वर काढले आहे. दुष्काळाच्या फेऱ्यानंतर पोटाच्या विकारांनी त्रस्त झालेला हा दुष्काळाचा दाह जळगाव जिल्ह्य़ात सध्या सक्रिय झाला आहे. ऐपत असलेले नागरिक विकतचे पाणी घेऊन तहान भागवत असून इतर मात्र तहान आणि अनेक विकारांशी लढताना दिसत आहे.

टंचाईग्रस्त गावे, शहरातील नागरिकांना टँकरद्वारे दिले जाणारे पाणी हे अधिग्रहित केलेल्या खासगी विहिरी तसेच विंधन विहिरींचे असते. बहुतांश ठिकाणी शुद्धीकरण न करता थेट पुरवठा केल्या जाणाऱ्या क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बऱ्याच वेळा टँकरमधील पाण्याला दरुगधी येते. दूषित, क्षारयुक्त पाणी सतत पिण्यात आल्याने आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या गावोगावी वाढली आहे. काही जणांचे मूत्रपिंडही निकामी झाल्याची उदाहरणे आहेत. पाण्यात विरघळलेले द्रव पदार्थाचे (क्षार) प्रमाण शोधण्यासाठी ‘टीडीएस’ (टोटल डिसॉल्व्ह सॉलिड) पद्धत वापरण्यात येते. डिजिटल मीटरच्या माध्यमातून पाण्यात असलेल्या क्षारांचे प्रमाण लगेच कळते. क्षार मोठय़ा प्रमाणात असल्यास त्याचा पाण्याच्या चवीवर विपरीत परिणाम होतो. सर्वसाधारण पाण्यातील टीडीएस १००च्या पुढेच असतो. पाण्यात जेवढय़ा जास्त प्रमाणात क्षार विरघळलेले असतील, तेवढय़ा पटीत टीडीएसचा आकडा वाढतो. साधारणत: १०० टीडीएसपर्यंतचे पाणी पिण्यास योग्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात विंधन विहिरीतून उपसा केलेले ६०० ते ८०० टीडीएसचे शुद्धीकरण न केलेले पाणी सर्रास पुरविले जात आहे.

जळगाव तालुक्याचे प्रातिनिधिक उदाहरण त्यासाठी देता येईल. तालुक्यातील ममुराबाद, असोदा, नशिराबाद, शेळगाव, भादली बुद्रुकसारख्या अनेक गावांसाठी जिल्हा परिषदेने तापी नदीवरून पाणीपुरवठय़ाची सोय केली आहे. मात्र दुष्काळामुळे तापी नदीतच पाणी नसल्याने संबंधित सर्व गावांना सध्या सार्वजनिक विहिरी तसेच विंधन विहिरींचे पाणी पुरविले जात आहे. जमिनीत क्षाराचे प्रमाण भरमसाट असल्याने विशेषत: विंधन विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असूनही ते वापरावे लागत आहे. बहुतांश गावांमधील क्षारयुक्त पाण्याचे टीडीएस मीटरने परीक्षण केल्यास सुमारे १२०० ते १५०० पीपीएम इतके आढळते. मानवी शरीर साधारणत: १०० ते ३०० टीडीएसचे पाणी सहजपणे पचवू शकते. मात्र सातत्याने जास्त टीडीएसचे पाणी पिण्यात आल्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये आजार बळावले आहेत.

विंधन विहिरीतील क्षारयुक्त पाण्याचा स्वयंपाकासाठी वापर केल्यावर अन्न बेचव होण्यासह खराब होते. पोट दुखते, असे ममुराबाद येथील जिजाबाई पाटील यांनी सांगितले. महिनाभरानंतर कधी तरी नळांना नदीचे पाणी येत असल्याने तहान भागविण्यासाठी नाइलाजाने टँकर तसेच विंधन विहिरींचे क्षारयुक्त पाणी वापरले जाते. यामुळे जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याचे आसोदा येथील रहिवासी किशोर चौधरी यांनी सांगितले.

विकतच्या पाण्यावर भिस्त

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात आता केवळ २० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जून-जुलैपर्यंत शहराला पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने कमी दाबाने पाणी मिळते. नेहमीच्या गळतीमुळे नळांना येणारे पाणी खूपच दूषित असते. त्यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी अनेकांना पाण्याचे जार घ्यावे लागतात. लग्नकार्यात टँकर मागवावे लागतात. त्यात महापालिका रात्री-अपरात्री केव्हाही नळाद्वारे पाणी सोडत असल्याने महिलांना जागरणाचा त्रास सहन करावा लागतो.

१४७ गावांत टँकरने पाणी

टंचाईला तोंड देणाऱ्या १४७ गावांत १३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये अंमळनेर तालुक्यातील सर्वाधिक ४२  गावे, खालोखाल पारोळा तालुक्यातील २७, चाळीसगावमधील २६, जामनेर २४, पाचोऱ्यातील नऊ , भुसावळ सहा, बोदवड आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येकी चार, जळगावमधील दोन आणि धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. याशिवाय २४२ गावांसाठी २४७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मतदानावर बहिष्काराचा इशारा

तापी नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भुसावळ शहरात सध्या २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हतनूर धरणाचे आवर्तन तापीच्या पात्रात सोडले जात नाही, तोपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याने नगरपालिकेने टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून संपूर्ण शहराची गरज भागविता येत नाही. काही जण स्वत:च्या खर्चाने टँकर आणून तहान भागविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना एका टँकरसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत. तीव्र टंचाईमुळे सिंधी कॉलनीसह अनेक भागातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

काय होत आहे?

जळगाव जिल्ह्य़ातील टंचाईने यंदा उग्र रूप धारण केले आहे. कायम पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टंचाईग्रस्तांना टँकर तसेच तळ गाठलेल्या सार्वजनिक विहिरी आणि विंधन विहिरींच्या अशुद्ध, क्षारयुक्त पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पिण्यास योग्य नसलेले दूषित पाणी सातत्याने पिण्यात आल्याने आबालवृद्धांना अतिसार आणि पोटदुखीच्या अनेक विकारांनी ग्रासले आहे, तर काहींचे मूत्रपिंडही अपुऱ्या जलसेवनाने निकामी झा्ले आहे.

टँकर किंवा विंधन विहिरीच्या पाण्यातील ‘टीडीएस’ जास्त असल्यामुळे नागरिकांना जुलाब तसेच मूत्रपिंडाच्या आजाराचा त्रास संभवतो. साधारणत: १३० ते १५० टीडीएसचे पाणी मानवी शरीरासाठी चांगले मानले जाते. जास्त टीडीएसचे क्षारयुक्त पाणी सतत पिण्यात आल्याने ते घातक ठरू शकते.  – डॉ. समाधान वाघ (साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव)

First Published on April 22, 2019 12:53 am

Web Title: water pollution
Next Stories
1 उमरगा : भरधाव कारला भीषण अपघात; पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू
2 अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राची घसरण
3 पाण्यासाठी कोरड्या नदीपात्रातील खड्ड्यांचा आधार
Just Now!
X