News Flash

कराड, मलकापूर पालिकांविरुद्ध पाणी प्रदूषणप्रकरणी गुन्हा

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कृष्णा, कोयनेबाबत कारवाई

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कृष्णा, कोयनेबाबत कारवाई
कराड व मलकापूर पालिकांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता कृष्णा, कोयनेत पाणी सोडले जात असल्याचा ठपका ठेवत राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने कराड नगरपालिका व मलकापूर नगरपंचायतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याबाबत नोटीसांवर नोटीसा बजावूनही त्याची दखल घेतली गेली नाही. यावर १९७४ च्या प्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातारा विभागाने कराड नगरपालिका व मलकापूर नगरपंचायतीच्या विरोधात कराडच्या प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला आहे. त्यात दोन्ही नगरपालिका, त्यांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी बी. एम. कुकडे यांनी याबाबतची तक्रार येथील प्रथमवर्ग फौजदारी न्यायालयाचे न्या. आर. एन. गायकवाड यांच्या न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही नगरपालिकांनी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारावी यासाठी मंडळाने काही महिन्यांची मुदतही दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत दोन्ही नगरपालिका सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभ्या करू शकल्या नाहीत. या दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मलकापूर व कराड नगरपालिकेचे सांडपाणी जेथे नदीत सोडले जाते, त्या ठिकाणचे दोन्ही नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्यासमवेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल दि. ८ डिसेंबर २०१५ रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सातारा विभागाला प्राप्त झाला होता. या अहवालाची माहिती देऊन दोन्ही नगरपालिकांना तातडीने सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभा करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचना केली होती. तसेच प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जाऊ नये, असेही आदेश देण्यात आले होते. मात्र, दोन्ही नगरपालिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशांना केराची टोपली दाखविल्याने १९७४ च्या प्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदींचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी बी. एम. कुकडे यांनी दोन्ही नगरपालिका, त्यांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याविरोधात येथील प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. याबाबतची सुनावणी दि. २ मे रोजी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने अ‍ॅड. बी. व्ही. मोहिते काम पहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 12:19 am

Web Title: water pollution in karad
Next Stories
1 राज्य उन्हाने होरपळले
2 तब्बल ९२ लाखांचा हिरा साईचरणी अर्पण
3 ‘दारूवाली बाई’ टीकेवरून नवाब मलिकांविरुद्ध तक्रार
Just Now!
X