शहरातील विस्कळीत व अनियमित पाणीपुरवठय़ाचे खापर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर फोडले. मंगळवारी आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीप्रश्नावर गंभीर चर्चा करीत नगरसेवक आक्रमक झाले, तर शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्यासमोर रिकामे माठ फोडत आयुक्तांना दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले. सभेतील विषय बाजूला ठेवून नगरसेवकांनी सुरुवातीपासूनच पाणीटंचाई प्रश्नावर चर्चेची मागणी लावून धरली.
शहरात ८ ते १० दिवसांनंतर अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठा सुरू आहे. कुठल्या भागात केव्हा पाणी सुटणार याबाबत नियोजन नाही. खासगी टँकरमधून पाण्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. महापालिकेने भाडय़ाने घेतलेले अध्रेअधिक टँकर गायब आहेत. या विषयावर आयुक्त अभय महाजन यांना धारेवर धरत माजी महापौर प्रताप देशमुख यांनी आक्रमक होत प्रशासनावर हल्ला चढविला. देशमुख यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी साथ दिली. एकूणच चच्रेत पाणीप्रश्नावर महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी फारसे गंभीर दिसले नाहीत. जवळपास दोन तास पाणीप्रश्नावरच चर्चा झाली.
पाणीविक्रीतून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे यांनी केला. त्या वेळी आयुक्त महाजन यांनी शहरात टँकरची संख्या वाढवू, असे मोघम उत्तर दिले. सचिन देशमुख यांनी पाणीपुरवठा योजना चालविण्यास महापालिका अकार्यक्षम ठरत असेल, तर खासगी एजन्सी नियुक्त करून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. जुन्या पंपावर लाखो रुपये दुरुस्तीसाठी खर्च होत असतील, तर नवीन पंप खरेदी करण्याची सूचना केली. शांताबाई लंगोटे यांनी संजय गांधीनगर, रमाबाई आंबेडकरनगर, आंबेडकरनगर या भागातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले.
माजी महापौर देशमुख यांचा आक्रमक पवित्रा
अॅड. जावेद कादर यांनी पाणीपुरवठय़ाच्या रोटेशनमध्ये अनियमितता असल्याने दर्गा रस्त्यावरील काझी बागमध्ये १५ दिवसांपासून पाणी नसल्याचे सांगितले. बाळासाहेब बुलबुले यांनी खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर मागणीनुसार भाव ठरतो. पाणी सोडण्याचे वेळापत्रक नाही ही बाब आयुक्तांच्या निर्दशनास आणली. यावर अभियंता रामराव पवार यांनी शहरातील पाणीपुरवठय़ावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अयुब व इस्माईल या दोन कर्मचाऱ्यांवर आहे. त्यांचे भ्रमणध्वनी बंद येत आहेत, अशी धक्कादायक माहिती दिल्यानंतर प्रताप देशमुख यांनी दोन कर्मचाऱ्यांवरच पाणीप्रश्नाची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तसेच महावितरणकडून विद्युतपुरवठा खंडित केल्याचे कारणही सयुक्तिक नाही. पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा केल्यास दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो. अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे महापालिकेची व नगरसेवकांचीही नाचक्की झाली आहे. आता आमचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी दिला. सत्तेत असल्यामुळे बोलता येईना म्हणून विरोधकाचा सहारा घ्यावा लागत आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना नगरसेवकांनी माठ फोडले
सुरुवातीलाच शिवसेनेने पाणीप्रश्नी आक्रमक पवित्रा घेत आयुक्त महाजन, महापौर संगीता वडकर व उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या समोरील टेबलपुढे रिकामे माठ फोडून निषेधाच्या घोषणा दिल्या. काही काळ ठिय्या मांडत आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. आयुक्तांनीही पाणीप्रश्नावर महापालिका समर्थपणे तोंड देऊ शकली नाही, असे नम्रपणे कबूल केले. शहरातील पाणीटंचाईसाठी कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असे उपमहापौर वाघमारे यांनी कबूल करून कुठल्या भागात कधी पाणी सुटणार, हे नगरसेवकालाही माहीत नसते. रात्री-अपरात्री पाण्याच्या टाकीवर मारामारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्मचारी घाबरून तेथून पळ काढतात. पाण्याच्या टाकीवर पोलीस बंदोबस्त लावण्याची सूचना त्यांनी केली. पाणीप्रश्नावरच गंभीर चर्चा झाल्यानंतर मूळ विषयपत्रिकेतील विषयावर चर्चा सुरू झाली. चच्रेत विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, सलीम इनामदार, उदय देशमुख, हसीबूर रहेमान, व्यंकट डहाळे आदींनी सहभाग घेतला.