पावसाचे प्रमाण, गावातील पाण्याची पातळी व दरडोई दिले जाणारे पाणी याचा अभ्यास करून प्रशासनाने जिल्हय़ातील ५३५ गावांत पाणीटंचाई उद्भवणार असल्याचे जाहीर केले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यात २५२, जानेवारी ते मार्च दरम्यान दुसऱ्या टप्प्यात १९२ व एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात १७१ अशा एकत्रित ५३५ गावांना पाणीटंचाई भासणार असून, या गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. लातूर तालुक्यातील मुरुड, कासारखेडा, बाभळगाव, हरंगुळ मंडळांतर्गत ४३ गावे, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, खंडाळी, अंदोरी या मंडळात ३०, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ व येरोळ या मंडळातील ३ गावांत पाणीटंचाई आहे.
रेणापूर तालुक्यात रेणापूर, पोहरेगाव, कारेपूर, पानगाव या मंडळातील ३६ गावांमध्ये, औसा तालुक्यातील लामजना, किल्लारी, मातोळा, भादा, बेलकुंड या मंडळातील ४२ गावांत, निलंगा तालुक्यात निलंगा, कासार बालकुंदा या मंडळात २२ गावांत जळकोट तालुक्यातील जळकोट, घोणसी मंडळात ३४ गावांत, उदगीर तालुक्यातील उदगीर, नागलगाव, देवर्जन, नळगीर, मोघा या मंडळातील १९ गावांत, चाकूर तालुक्यातील चाकूर, वडवळ नागनाथ, झरी, नळेगाव या मंडळातील १८ गावांत टंचाई घोषित करण्यात आली.
५७९ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड
जिल्हय़ातील ७८५ पकी ५७९ ग्रामपंचायतींना पाण्याच्या स्रोतांच्या स्वच्छता सर्वेक्षणात हिरवे कार्ड मिळणार आहे. जिल्हय़ातील २०८ ग्रामपंचायतींमधील ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र व अल्प जोखीम स्रोताचे पाणी पिण्यास वापरते, तर ५७९ ग्रामपंचायतींतील ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त लोकसंख्या अल्प जोखमी स्रोताचे पाणी पिण्यास वापरते. जिल्हय़ातील विहीर, िवधनविहीर व नळपाण्याच्या ४ हजार ७०० स्रोतांचे स्वच्छता व पाणी गुणवत्तेचे दोनदा सर्वेक्षण करण्यात येते. या वर्षी २ ते ३० ऑक्टोबर दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. यात २०८ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले.
स्वच्छता सर्वेक्षणात सभोवतालचा परिसर, १५ मीटर अंतरापर्यंत सांडपाणी साचून राहते का?, १५ मीटर अंतराच्या उंचीवर शौचालय, गायी, गुरांचा गोठा आहे का?, पाणी वितरणाच्या वाहिनीत गळती आहे का?, पिण्याच्या पाण्याची टाकी तीन महिन्यांतून एकदा स्वच्छ करून टाकीवर तसे लिहिले जाते का? आदींची तपासणी केली जाते. ज्या ग्रामपंचायतींना ५ ते २५ गुण दिले आहेत ते पाण्याचे स्रोत सौम्य जोखमीचे, ३० ते ६५ गुण असणाऱ्या ग्रामपंचायतींतील पाण्याचे स्रोत मध्यम जोखमीचे, तर ७० पेक्षा जास्त गुण असणाऱ्या ग्रामपंचायतींतील पाणी तीव्र जोखमीचे असते. लातूर जिल्हय़ातील एकाही ग्रामपंचायतीतील ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखीम स्रोताचे पाणी पिण्यास वापरत नसल्याने जिल्हा रेडकार्डमुक्त झाला असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुभाष मद्रेवार यांनी सांगितले.