लातूर जिल्ह्य़ातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे की, शाळकरी विद्यार्थ्यांना पाणी भरावेच लागते. त्यामुळे आता विद्यार्थीच प्रश्न विचारत आहेत,  ‘सांगा मी काय करू ? शाळा करू का पाणी भरू ?’  जिल्हाभरात सध्या ७७ गावांत १११ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दर दिवशी टँकरच्या संख्येत वाढच होते आहे. गावातील विंधनविहिरींचे अधिग्रहणही वाढते आहे.
पहाटेपासूनच घरोघरी पाणी प्रश्न सर्वाना भेडसावत असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या प्रश्नापासून सुटका नाही.
मिळेल तेथून पाणी आणणे याला पर्याय असत नाही. त्यामुळे परीक्षा तोंडावर आलेली असतानाही अभ्यासाची पुस्तके गुंडाळून ठेवून पाण्याच्या घागरी कधी डोक्यावर तर कधी सायकलीला अडकवून मुलांना व मुलींना पाण्याच्या शोधात फिरावे लागते आहे. जिल्हय़ातील जवळपास प्रत्येक गावातच असे चित्र आहे. शाळेच्या भिंतीपेक्षा टँकरचा खडखडाट त्यांचे लक्ष वेधतो आहे. शाळा सुरू असली तरी गावात जर टँकर आला तर चक्क गुरुजींना सांगून पाणी भरायला मुले सुट्टी घेतात याची अनेक उदाहरणे जिल्हय़ात आहेत. नववीपर्यंतच्या परीक्षा मार्च अखेरच संपवल्या तर या मुलांना पाण्यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. कारण घरोघरी कुटुंबाची संख्या मर्यादित व मोठी मंडळी कमावून आणण्यासाठी गुंतलेली असल्यामुळे पाण्यासाठीची भिस्त लहान मुलांवरच आहे.