|| निखिल मेस्त्री

मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव, मात्र नगर परिषद हद्दीतील अनेक गावे तहानलेलीच

पालघर : पालघर नगर परिषदेच्या सत्ताधारी कार्यकारिणीने जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. मात्र  नगर परिषद हद्दीतील अनेक भागांमध्ये कुटुंबे  तहानलेलीच आहेत याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  आजही  अनेक भागांत महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

पालघर नगर परिषद विविध प्रभागांच्या विकासकामांकरिता कोट्यवधीचा निधी वापरत असला तरी पालघर नगर परिषद क्षेत्रात पूर्वेकडील प्रभाग अजूनही मागासलेलाच दिसून येतो.  प्रभाग क्रमांक चारमधील मोरवाळी तर प्रभाग क्रमांक पाचमधील मेढा परिसरात अनेक सोयीसुविधांची वानवाच आहे. मोरवाळी या भागात सुमारे साठ ते सत्तर  तर मेढा भागात २० ते २५  कुटुंबे वास्तव्यास आहेत. हे दोन्ही पाडे  तहानलेलेच आहेत.  पिण्याचे शुद्ध पाणी नसल्याने येथील ग्रामस्थ विंधन विहिरीतील क्षारयुक्त पाणी पिऊन  आपला जीव धोक्यात घालत आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात या दोन्ही भागांना पाणीटंचाईसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  मोरवाळी व मेढा या दोन्ही भागांमध्ये बहुतांश  आदिवासी कुटुंबे आहेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा  घेत नगर परिषद त्यांच्याकडे  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे.

दोन्ही पाडे नगर परिषदेत सामाविष्ट केले असले तरी या आदिवासी कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा नगर परिषदेने दिल्या नाहीत किंवा तरतूदही केली नाही. या भागात अंगणवाडी नसल्याने ओट्यावर ती भरवावी लागत आहे. या भागातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या उदासीन धोरणामुळे हे पाडे सोयीसुविधांपासून  दूर आहेत. नगर परिषदेने  नळपाणीपुरवठाद्वारे पाणी देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी समोर येत आहे

 

उपलब्ध पाणीही अपुरे

ज्या शाळेतून येथील कुटुंबे पाणी भरत आहेत ती टाकी एक हजार लिटरची आहे. दिवसातून दोनदा ती भरून नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते. मात्र सुमारे ३५० नागरिकांना दररोज दोन हजार लिटर पाणी अपुरे पडत आहे. पाण्यासाठी महिलांची वणवण होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही नगर परिषद लक्ष देत नाही. हा भाग अनेक वर्षांपासून पाणी व इतर सुविधांपासून वंचित आहे, याकडे मोरवाळीचे संतोष लडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न

जिल्हा परिषद शाळेच्या विंधन विहिरीतून या दोन्ही पाड्यांना पाणी दिले जात आहे. मात्र सुमारे तीनशे लोकांच्या वस्तीसाठी हे पाणी अपुरे पडत आहे. विंधन विहिरीवर पाणी भरण्यावरून महिलांमध्ये  दररोज शाब्दिक वाद उद्भवत आहेत असे येथील ग्रामस्थ सांगतात. शाळेच्या विंधन विहिरीवरून नागरिकांची घरे उंच ठिकाणावर असल्याने हंड्यातून व बादलीतून घरात पाणी नेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे पाणीही अशुद्ध येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. अनेक नागरिकांना घसा खवखवणे, दंत आजार जडले आहेत. लहान मुलांमध्ये त्वचारोगाचे प्रमाणही असल्याचे येथे सांगितले जाते.

पाणी प्रशद्ब्रासंदर्भात मेढा आणि मोरवाळी या परिसराची पाहणी व सर्वेक्षण करण्यात येईल. त्यानंतर ग्रामस्थांना कशा पद्धतीने पाणीपुरवठा  करावा याचे  प्रयोजन केले जाईल. – डॉ.उज्ज्वला काळे, नगराध्यक्षा, पालघर

सत्ताधारी कार्यकारिणी नगर परिषदेचे पाणी इतरत्र वळवून येथील नागरिकांना समस्यांच्या खाईत लोटण्याचे कारस्थान करीत आहे. आधी इथल्या नागरिकांची तहान भागवा, नंतरच हे पाणी इतर ठिकाणी द्या. – भावानंद संखे, विरोधी पक्ष नेता, न. प. पालघर