राहटी येथील दोन पंप नादुरुस्त असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दोनपकी एक पंप तातडीने दुरुस्त करुन घेण्याची कार्यवाही चालू आहे. येत्या सोमवापर्यंत (दि. २०) पंप दुरुस्त होऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे लेखी आश्वासन आयुक्त अभय महाजन यांनी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांना दिले.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून १०-१२ दिवसांनी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठय़ाचे नियोजन बिघडले. विरोधी पक्षनेत्या डहाळे शुक्रवारी शिवसेना नगरसेवकांसह महापालिकेत गेल्या होत्या. पाण्यासाठी आजपासूनच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त अभय महाजन यांनी चच्रेची तयार दाखवली. चच्रेत येत्या ६ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
शहरातील ज्या भागात जलवाहिनी नाही, तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास सरकारकडे निधी मिळण्यासाठी डिसेंबरमध्येच प्रस्ताव सादर करण्यात आला. तो अजून मंजूर झाला नाही, असे महापालिकेने लेखी आश्वासनात म्हटले. सामाजिक कार्यकत्रे, सेवाभावी संस्था व मनपा सदस्या यांच्यामार्फत मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील पाणी असलेले नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्यास प्रभागनिहाय साहित्य खरेदी करण्यात आली. दुरुस्तीचे काम चालू आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दररोज फक्त सहाच हातपंप दुरुस्त होत आहेत. हातपंप दुरुस्तीस मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे डहाळे म्हणाल्या. महापालिकेने ६ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.