25 February 2021

News Flash

फेब्रुवारीतच वसईकरांना पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाईच्या विरोधात प्रहार संघटनेने हंडा मोर्चा काढला होता.

विरार :  वसई विरार महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्याच्या अगोदरच नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या वसईकर अघोषित पाणीटंचाईमुळे हैराण झाले आहेत. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकताच या पाणीटंचाईच्या विरोधात प्रहार संघटनेने हंडा मोर्चा काढला होता. पण अजूनही पाणी समस्या तीव्र होत असलाने नागरिक हैराण आहेत. यात विरारच्या पूर्व पट्ट्यातील सहकार नगर, फुलपाड़ा, चंदनसार ,मनवेल पाडा, कारगिल नगर ,साई नाथ नगर, चौधरी वाडी, गांधी चौक, जनकपूर धाम, आर जे नाका, जीवदानी पाडा,नाना नानी पार्क स्टेशन परिसर  मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. या परिसरात  दोन ते तीन दिवसाआड पाणी येत आहे. त्यातही पाणी कमी दाबाने आणि कमी वेळ येत असल्याने अनेकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या शहरात सूर्या योजनेतून २०० एम एल डी,  २० एम एल डी उसगाव योजनेतून आणि १० एम एल डी पेल्हार योजनेतून पाणीपुरवठा होत आहे. यात  विरार पूर्व  परिसरात पाणीपुरवठा करणारे पापडखिंड धरण पालिकेने बंद केले आहे. यामुळे वितरण व्यवस्थेवर याचा परिणाम झाला आहे. तसेच अमृतयोजनेतील विविध जलकुंभाची कामे अपूर्ण आहेत. यामुळे जलसाठा करणे कठीण आहे. त्याचा बरोबर जलवाहिन्यांची जोडणी बाकी असल्याने अनेक ठिकाणी पाणी पुरवठा कमी होत आहे. याच कारणाने शहरात ऐन फेब्रुवारी महिन्यातच नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात.

मोरेगाव येथील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे.  सध्या वितरण व्यवस्थेत काही त्रुटी समोर येत आहेत, त्यावर काम करणे सुरू आहे. लवकरच या समस्यांवर मात करून शहरातील पाणीपुरवठा सुरुळीत केला जाईल. -सुरेंद्र ठाकरे, अभियंता, पाणीपुरवठा, वसई-विरार महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:25 am

Web Title: water problem vasai akp 94
Next Stories
1 शिवसेना खासदाराच्या वक्तव्याने कोकणात पुन्हा वाद
2 रायगडावरील रोषणाईवरून दोन खासदारांमध्येच वाद
3 पश्चिम विदर्भावर करोनाचा विळखा अधिकच घट्ट!
Just Now!
X