कासा : जव्हार तालुक्यातील चोथ्याची वाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी मार्च सुरू  झाला की गावातील विहिरी आटून तळ गाठतात. त्यामुळे दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या महिलांना काम सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

पाणी आणायच्या कामात लहान मुलांचीही मदत घेतली जाते. गावात पाणी नसल्याने गावातील महिला आणि लहान मुले यांना पाण्यासाठी काही किमी अंतरावरील हातपंपावर जावे लागत आहे. महिलांना एक किमी अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. तर लहान मुले व्हीलड्रमने पाणी वाहत आहेत.

चोथ्याची वाडी गावामध्ये साधारणपणे १२० ते १२५ कुटुंबे राहतात. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या सगळ्यांचे पाण्यासाठी अतिशय हाल होत आहेत. गावातील महिलांचा संपूर्ण दिवस पाणी मिळवण्यासाठी जात असल्याने रोजगार बुडत आहे. या गावामध्ये पाणीटंचाईची स्थिती असताना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

पिण्यासाठी पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि पाणी पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही चोथ्याची वाडी गावातील साडेबाराशे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाने गावाला बारमाही पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की गावामध्ये पाणीटंचाई सुरू होते. त्यामुळे आम्हाला एक किमीवर पाणी आणायला जावे लागत आहे. शासनाने गावासाठी बारमाही पाण्याची सोय करावी. – सुलोचना बरफ, नागरिक