गेल्या आठवड्यात झालेल्या नागपुरात मुसळधार पावसामुळे विधान भवनात पाणी शिरून परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. विरोधी पक्षांनी याचे भांडवल करत सरकारवर टीका केली होती. पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा अट्टहास कुणाचा असा जाब अजित पवार यांनी विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अतिवृष्टीमुळे विधान भवनात पाणी साचल्याची कबुली देत या परिस्थितीस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, सभागृहात येण्यासाठी आधी फक्त लाल गालिचा अंथरण्यात आला होता. आता पावसाच्या पार्श्वभूमीवर वॉटरप्रूफ लाल कार्पेट बसवण्यात आले आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सुरक्षा भिंतही उभारण्यात आली आहे.

पावसाचे पाणी विधान भवनात शिरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आता विधान भवनाच्या तळघरातील वीज पुरवठा केंद्रात पुन्हा पावसाचे पाणी शिरू नये म्हणून तेथे आता दोन फुटांची सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. पुन्हा अतिवृष्टी झाल्यास पाणी साचू नये म्हणून परिसरातील सर्व गटारांची युद्धपातळीवर सफाई करण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे विधीमंडळाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. विधान भवनातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. विधान भवन परिसरातील गटारींमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वत: परिसराची पाहणी केली होती. हा मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेतही उपस्थित केला होता. जनतेचा पैसा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे वाया गेल्याचा ठपका ठेवत कारवाईची मागणी केली होती.