वाडा तालुक्यात जलशुद्धीकरण योजनांची रखडपट्टी

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : वाडा तालुक्यात विविध गावांमध्ये शंभरहून अधिक नळपाणी पुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहेत. यातील केवळ मौजे गांध्रे येथील एकमेव नळपाणी पुरवठा योजनेत जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. अर्थात ही यंत्रणा सरकारच्या वतीने नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय शीतपेय निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पैशातून उभारण्यात आली आहे. उर्वरित सर्व नळपाणी योजनांमध्ये जलशुद्धीकरणाबाबत बोंब आहे. त्यामुळे पावसाळ्यात गढूळ पाणी घशाखाली ढकलावे लागत आहे.

गढूळ पाण्याने जलजन्य आजारांनी बहुतांश गावांमधील नागरिक बेजार झाले आहेत. यावर कुडूस कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी अनिरुद्ध पाटील यांनी पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला ग्रामस्थांना दिला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी शुद्ध करून पिण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अडचणी काय?  

जलशुद्धीकरण यंत्रणा उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च येतो. हा खर्च उचलण्याची ग्रामपंचायतींची ताकद नसल्याचे बोलले जात आहे. शासनाकडूनही नळपाणी पुरवठा योजनेसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारणीसाठी पुरेसा निधी पुरवला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

५० टक्के निधीची तरतूद

केंद्र शासनाकडून १५व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधींपैकी ५० टक्के निधी हा पिण्याच्या पाण्यासाठी बंधित स्वरूपात ठेवण्यात आला आहे. हा निधी केवळ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या योजनांसाठीच खर्च करण्यात यावा, अशा सूचना सर्वच ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. मात्र या तुटपुंज्या निधीतून नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच भर दिला जात आहे.

..पण फारसा उपयोग होत नाही    

पावसाळ्यात विहिरींमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून ‘टीसीएल’ची भुकटी उपयोगात आणली जात आहे. याशिवाय घरोघरी पाणी शुद्धीकरण करणाऱ्या औषधांचा (मेडिक्लोअर) पुरवठा केला जात आहे. मात्र, शुद्धीकरणासाठी या औषधांचा फारसा उपयोग होत नसल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण दवाखान्यात दाखल होताना दिसून येत आहेत.

सद्य:स्थिती

* नदीच्या काठावर बांधलेल्या विहिरीतून गावांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात अनेकदा नद्यांना पूर येतो. त्यात नदीकाठच्या विहिरी पाण्याखाली जातात. पूर ओसरल्यानंतर विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण केले जात नाही.

* विद्युत पंपाच्या साहाय्याने अशुद्ध पाण्याचाच पुरवठा गावांमधील टाक्यांमध्ये केला जातो.

* काही गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांच्या माध्यमातून नळयोजना सुरू आहेत. मात्र हे पाणी शुद्धीकरण न करताच नळांद्वारे पुरवले जात आहे.

* वाडा नगरपंचायत क्षेत्रासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची जलशुद्धीकरण यंत्रणा गेली दहा वर्षे नादुरुस्त आहे. क्षेत्रातील ३५ हजारांहून अधिक लोक गढूळ पाणी पीत आहेत. कुडूस येथील जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम निधीअभावी रखडले आहे.