24 October 2020

News Flash

उजनीच्या पाणी व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे पूरस्थिती?

आधी पावसाकडे दुर्लक्ष, नंतर अकस्मात विसर्गात वाढ

आधी पावसाकडे दुर्लक्ष, नंतर अकस्मात विसर्गात वाढ

अतिवृष्टीचा इशारा असतानाही जलसंपदा विभागाने पूर्ण भरलेल्या उजनी धरणातून योग्यवेळी पुरेशा क्षमतेने पाणी सोडण्याबाबत उदासीनता दाखवली. १४ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंतच्या ८ तासांत अचानक विसर्ग वाढवत दोन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील पूरस्थिती चिघळल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मागच्या वर्षी सांगली-कोल्हापुरातील पूरस्थितीही पाण्याचा विसर्ग अकस्मात वाढल्याने चिघळल्याचा आरोप करण्यात आला होता.

भीमा नदीवरील उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्य़ातील शेती-नागरी वस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  अतिवृष्टीमुळे पूर येणे अटळ होते तरीही उजनी धरणातील पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचे बोलले जात आहे.

हवामान विभागाने वेळीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सोमवार, १२ ऑक्टोबरपासून सोलापूर-पुणे पट्टय़ात पाऊस सुरूच होता. उजनी धरणही पूर्णपणे भरलेले होते.  त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा आल्यानंतर व प्रत्यक्ष जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतरही १२, १३ ऑक्टोबरला व नंतर १४ ऑक्टोबरच्या दुपापर्यंत कमाल २० हजार क्युसेक पाणी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते. १४ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास ४० हजार क्युसेक, सव्वाचारच्या सुमारास ५० हजार क्युसेक, पाचच्या सुमारास ८० हजार क्युसेक असे करत मध्यरात्रीपर्यंत सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच दुपारी तीन ते रात्री १२ या ९ तासांच्या कालावधीत सुमारे दोन लाख क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात समुद्रच शिरल्यासारखे हे पाणी आल्याने ते धरणापासून ते थेट अक्कलकोटपर्यंतचा नदी काठच्या शेतीतच नव्हे तर गावांमध्ये घुसले.

त्यामुळे १२ ऑक्टोबरपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतरही जलसंपदा विभागाचे अधिकारी १४ ऑक्टोबरच्या दुपापर्यंत पाणी सोडण्याबाबत उदासीन का होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. १२ ऑक्टोबरपासूनच पाणी सोडण्याचा वेग टप्प्याटप्प्याने वाढवण्याबाबत नियोजन झाले असते तर १४ ऑक्टोबरच्या दुपारनंतरच्या ९ तासांत दहापट वेगाने पाणी सोडण्याची वेळ नसती. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती अटळ होती तरी अस्मानीबरोबरच हे सुल्तानी संकट असल्याचा संताप सोलापुरात व्यक्त होत आहे. तर उजनी धरणाच्या पाणलोट भागात तीन तासांत २५० मिमी पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी अचानक वाढली व अकस्मात पाणी सोडावे लागले, असे जलसंपदा विभागाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरणातून अकस्मात मोठय़ा प्रमाणात पाणी सोडावे लागल्याची दखल घेतली असून, त्यामागील कारणमीमांसा स्पष्ट करणारा अहवाल कार्यकारी संचालकांकडून मागवला आहे.      

– संजय घाणेकर, सचिव, जलसंपदा विभाग

अतिवृष्टीचा इशारा दिला गेला असतानाही धरणांतून १२ ऑक्टोबर व १३ ऑक्टोबरला १५ ते २० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. १४ ऑक्टोबरला तो वाढवण्यास सुरुवात झाली आणि तो  दोन- सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत गेला. जलसंपदा विभागाने या संदर्भातील तपशीलवार माहिती जाहीर करावी. पूर टाळता आला नसता का? त्याची तीव्रता कमी करता आली नसती का याबद्दल चर्चा झाली पाहिजे.

– प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:45 am

Web Title: water release from ujani dam cause flood situation in solapur district zws 70
Next Stories
1 रावेर हत्याकांड : सात संशयित ताब्यात
2 दिलासादायक, महाराष्ट्रात आज १४ हजार २३८ करोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
3 करोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Just Now!
X