27 October 2020

News Flash

स्वत:ची पाणीपुरवठा योजना उभारणारे गाव!

शासकीय मदतीवर अवलंबून न राहता मजूर कुटुंबांचा उपक्रम

शासकीय मदतीवर अवलंबून न राहता मजूर कुटुंबांचा उपक्रम

उन्हाळा आला की भेडसावणारी दरवर्षीची टंचाई, दोन हंडे पाण्याच्या शोधात करावी लागणारी पायपीट आणि इतके हाल सुरू असतानाही शासनाकडून झालेले दुर्लक्ष, अशा प्रतिकूल परिस्थितीत अन्य एखाद्या गावाने कदाचित आंदोलन वा उपोषणाचा मार्ग निवडला असता. पण मुरबाडजवळील महाज गावाजवळील एका पाडय़ावर २१ मजूर कुटुंबांनी थेट स्वत:ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाच सुरू केली. शासकीय मदतीची वाट न पाहता वर्षभर पैसे साठवून या कुटुंबांनी राबवलेल्या या पाणीयोजनेमुळे या गावात आता उन्हाळय़ातही अखंडित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या ५० वर्षांच्या भीषण टंचाईनंतर आलेल्या या पाण्याच्या प्रयत्नांनी शासनांसह सर्वसामान्य ग्रामस्थांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातले आहे.

ठाणे जिल्ह्य़ाच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुरबाड शहरापासून सुमारे ३२ किलोमीटरवरील महाज गावाचीही अशीच अवस्था आहे. गावाबरोबरच नजीकच्या पाडय़ांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. महाजजवळच्या एका पाडय़ावर राहणाऱ्या  २१ कष्टकरी कुटुंबांची उन्हाळ्यात फरफट होत असे. ही सर्व कुटुंबे मोलमजुरीवर उदरनिर्वाह करतात. पण उन्हाळय़ाच्या दिवसांत प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला घरातील पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत होते. एप्रिल महिन्यातच येथील विहिरी तळ गाठत. त्यामुळे पुढचे दोन महिने या कुटुंबांसमोर पाण्यासोबतच कमाईचाही प्रश्न निर्माण होत असे.

पाडय़ाची ही दशा वर्षांनुवर्षांची. पण शासकीय यंत्रणेचे त्याकडे कधीच लक्ष गेले नाही. गावातील काहींनी सरकारी मदत मागण्याचा विचार बोलून दाखवला. पण ज्या सरकारी यंत्रणेला पाडय़ाची अवस्था दिसत नाही, ती यंत्रणा मदत किती तत्परतेने करेल, याबाबत शंकाच होती. त्यामुळे मग गावानेच स्वत:ची पाणीयोजना राबवण्याचा निर्धार केला.

स्वत:ची पाणीयोजना उभारण्यासाठी एकरकमी पैसे जमा होणे कठीणच होते.  त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने पदरमोड करीत पैसे जमविण्यास सुरुवात केली.  अखेर वर्षभरानंतर प्रत्येक घराने २० हजार रुपये जमा केले आणि त्यातून पाडय़ापासून काही अंतरावर कूपनलिका खोदण्यात आली. तेथे कूपनलिकेला पाणी लागल्यावर ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुमारे एक किलोमीटरवरील कूपनलिकेपासून पाडय़ापर्यंत कमीत कमी खर्चात जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी ४ ते ५ घरांसाठी एक पाण्याची टाकी अशा पद्धतीने गावात ५ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. तसेच या टाक्यांमधून प्रत्येक घरात नळही देण्यात आला. त्यातून पाहता पाहता गुढीपाडव्यापासून गावात अखंडित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यामुळे पाण्यासाठी पायपीट करावी लागत असलेल्या महिला, पुरुष, लहान मुले-मुली आंनदी झाले आहेत, असे विठ्ठल म्हाडसे यांनी सांगितले.

तरीही पाणीबचत

चार कोसावरील पाणी घरातील भांडय़ात थेट येत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान असले तरी पाणीटंचाईचे चटके सोसलेल्या ग्रामस्थांनी पाणीबचतीवर भर दिला आहे. ज्या ठिकाणी कूपनलिका लागली त्याच्या बाजूला शेत तळे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याचा फायदा भविष्यात ग्रामस्थांनाच होणार आहे, असे येथील ग्रामस्थ किशोर घोलप यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 2:06 am

Web Title: water resource management
Next Stories
1 मनपसंत गृहरचनेची ठाण्यात मुभा!
2 शहरांच्या वेशीवर कचऱ्याचे साम्राज्य
3 ‘केडीएमटी’चे खासगीकरण
Just Now!
X