|| प्रबोध देशपांडे

अकोला-अकोट ब्रॉडगेजच्या कामातूनही तिहेरी लाभ

सकारात्मक विचार संपूर्ण परिसराचे कसे भाग्य उजळवू शकतो, हे दाखवून दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका निर्णयाने. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची जलसंधारणाच्या कामासोबत सांगड घालण्यात आली. महामार्गाच्या पायात भर घालण्यासाठी पाच कि.मी.च्या परिसरातील नदी-नाले, तलावांचे विनाखर्च खोलीकरण करून त्यातील गौणखनिजांचा वापर करण्याचा निर्णय  घेण्यात आला. त्यामुळे गत नऊ महिन्यांत महामार्ग निर्माणाच्या कार्यासोबतच पश्चिम वऱ्हाडातील अकोला व बुलढाणा जिल्हय़ात जलसमृद्धी झाली. अकोला जिल्हय़ात दोन हजार ७००, तर बुलढाणा जिल्हय़ात तीन हजार ४०० टीसीएम पाणीसाठय़ाची क्षमता निर्माण झाली. याच प्रकारे अकोला-अकोट रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामातही तिहेरी लाभ झाला.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबरोबर परिसरातील जलसंधारणाची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करून घेण्याची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी अकोल्यातच मांडली होती. लगेचच परिपत्रक काढण्यात आले. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने २९ नोव्हेंबर २०१७ ला आदेश जारी केला. कंत्राटदारांनी पाच कि.मी.च्या परिसरातील शेततळे, तलाव, नाला, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, पुनरुज्जीवन मोफत करून त्यातून निघणारा मुरूम, माती, गाळ महामार्गाच्या कामात वापरायचा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम सुरू असलेल्या अकोला व बुलढाणा जिल्हय़ात व्यापक काम झाले. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परिसरात सिंचनाची मोठी व्यवस्था निर्माण झाली. कंत्राटदरांनाही कामाच्या जवळच गौणखनिज उपलब्ध झाल्याने महामार्गाच्या कामाची गती वाढली. जलसंधारणाच्या कामामुळे जलसाठय़ांच्या क्षमतेत भरीव वाढ झाल्याचे चित्र आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हा अभिनव प्रयोग पश्चिम वऱ्हाडात यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

जिल्हय़ात ७२ ठिकाणी कामे करून ११ लाख ३९ हजार ७२७ ब्रास गौणखनिज उपलब्ध करून देण्यात आले. त्या माध्यमातून २७३८.७९ टीसीएम पाणीसाठय़ाची क्षमता निर्माण झाली. बुलढाणा जिल्हय़ातही या अंतर्गत चांगली कामे झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने १०० घनमीटर उत्खननाची परवानगी दिली. आतापर्यंत ६८ ठिकाणावरून ३४ लक्ष घनमीटर उत्खनन करण्यात आल्याने जिल्हय़ात महामार्गालगत ३४१० टीएमसी पाणी साठवण क्षमता तयार झाली. याच धर्तीवर अकोला-अकोट रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामातही तिहेरी लाभ झाला आहे. जिल्हय़ामध्ये लोहमार्ग विस्तारीकरणाची कामे व जलसंधारणाची कामे यांची सुयोग्य सांगड घालून अकोट तालुक्यात नऊ ठिकाणी परवानगी देण्यात आली. शेततळे, खोदतळे, गावतलाव, नाला खोलीकरण झाल्यामुळे जलसंधारणाच्या कामांसाठी येणाऱ्या खर्चाची बचत झाली. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होत आहे. रेल्वेमार्गासाठी लगतच गौणखनिज उपलब्ध झाल्याने कामाला गती मिळाली. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौणखनिजाची रेल्वे विभागाकडून ९ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान ३१ कोटी ७८ लाखांची रॉयल्टीसुद्धा महसूल विभागाला प्राप्त झाल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी सांगितले. अमरावती जिल्हय़ामध्येही ५१ हजार ५०० ब्रास गौणखनिज देऊन चार ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली. या प्रयोगाच्या माध्यमातून वऱ्हाडात जलसंधारणाचे बळकटीकरण झाले.

महामार्ग व जलसंधारणाचे व्यापक कार्य

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य शासनाच्या समन्वयातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच जलसंधारणाचे व्यापक कार्य झाले. महामार्गाच्या कामाला लगतच गौण खनिज उपलब्ध झाले. त्या मोबदल्यात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला.     – विलास ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती.

मृतप्राय कमळगंगा नदीचे पुनरुज्जीवन

मूर्तिजापूर तालुक्यातील मृतप्राय कमळगंगा नदीचे खोलीकरण करून पुनरुज्जीवन करण्यात आले. आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेण्यात आला. एके काळी जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमळगंगा नदीचे पूर्णत: अस्तित्वच संपले होते. गाळ व मातीमुळे ही नदी अदृश्य झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराकडून २३ कि.मी. लांबीच्या कमळगंगा नदीचे १० कि.मी. खोलीकरण करण्यात आले. या जलसंधारणाच्या कामामुळे कमळगंगा नदीचा कायापालट झाला आहे.

संशोधन व उद्योगांना चालना

पाण्याअभावी औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक उद्योग ठप्प पडले होते, तर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधन कार्यही चांगलेच प्रभावित झाले. बीसीसी कंपनीने जलसंधारणाच्या कामांमध्ये अकोला औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कुंभारी येथील तलावाचे खोलीकरण केले. कृषी विद्यापीठांमध्येही जलसंधारणाची अनेक कामे केल्याने मोठय़ा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला. त्यातून संशोधन व उद्योगांना चालना मिळाली.

  • दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या अकोला व बुलढाणा जिल्हय़ात जलसंधारण व जलसंवर्धनाचे व्यापक कार्य झाले. त्यामुळे दोन्ही जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. शेततळे, खोदतळे, गावतलाव, नाला, नदी यांचे खोलीकरण, रुंदीकरण व पुनरुज्जीवन झाले.
  • राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात गौण खनिजे लागतात. या उपक्रमाच्या माध्यमातून महामार्ग कामालगतच मुरूम, माती, दगड घेण्यात आले. त्या मोबदल्यात विनाखर्च जलसंधारणाची कामे करून देण्यात आली. त्यामुळे महामार्गाच्या कामाला गती मिळाली व पैशांची बचत झाली.
  • या उपक्रमामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातही विनाखर्च शेततळे निर्माण करण्यात आल्याने सिंचनाची सुविधा निर्माण झाली. गौणखनिजे वाहून नेण्यासाठी तलावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली.
  • एक टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्यास साधारणत: एक लाख ५३ हजारांचा खर्च येतो. दोन्ही जिल्हे मिळून ६१४८ टीसीएम पाणीसाठय़ाची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामावर शासनाच्या ९४ कोटी सहा लाखांची बचत झाली आहे. सोबतच दर्जेदार कामेही झाली.