हजारे आंदोलनावर ठाम

पारनेर : जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी कोणताही ठोस प्रस्ताव न दिल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासमावेत राळेगणसिद्धीत झालेली त्यांची सुमारे दीड तासांची चर्चा निष्फळ ठरली. नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवणे गैर होईल, असे सांगत हजारे यांनी आपण येत्या तीस जानेवारी पासूनच्या राळेगणसिद्धीतील आंदोलनावर ठाम असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्ली येथील आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने येत्या ३० जानेवारीपासून हजारे हे राळेगणसिद्धीतील संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणास बसणार आहेत. त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी मंत्री डॉ. महाजन हे राळेगणसिद्धीत आले होते. दुपारी दोन वाजता ते येणार असे सांगण्यात आले होते, परंतु औरंगाबाद येथील कार्यक्रम लांबल्याने सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते राळेगणसिद्धीत पोचले. तब्बल दीड तास हजारे व महाजन यांच्यात चर्चा झाल्यानंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. महाजन म्हणाले,की लोकपाल व लोकायुक्त नियुक्त करण्यासंदर्भात तांत्रिक  त्रुटी दूर  झाल्या असून सुमारे  ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आढवा घेत लोकायुक्त नियुक्त करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेतली आहे. येत्या २७ तारखेस मुख्यमंत्री व हजारे यांच्यात भेट शक्य असून या भेटीतून तोडगा निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करण्यासंदर्भात १९६२ पासून अनेकदा विधेयक संसदेत मांडण्यात आले, मात्र ते एकदाही पारित होऊ शकले नाही. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कुठेतरी या विषयाला चालना मिळाली आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत नियुक्त्या होतील का, असे विचारले असता, ते सांगणे कठीण आहे. वेळ खूप कमी असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

हजारे म्हणाले,‘ नुसत्या आश्वासनाचा काय उपयोग ? जोपर्यंत लोकपाल लोकायुक्त नियुक्त होत नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही. हे सरकार गेली पाच वर्षे आश्वासनेच देत आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे सरकार कसे खोटे आहे हे आपण लोकांसमोर मांडणार आहोत.

डॉ. महाजन यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांचे पत्र आणले आहे, मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत चालढकल करण्याचा हा प्रकार असल्याचे हजारे म्हणाले. गेल्या २९ मार्चला याच जितेंद्र सिंह यांनी लेखी आश्वासन दिले होते,

९ महिने पंतप्रधान कार्यालयाकडून आश्वासनाची पूर्तता होत नसेल,तर यांच्या पत्रावर काय विश्वास ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.  सत्तेवर येण्यापूर्वी मोदी म्हणत, लोकपालसाठी अण्णा हजारे यांनी प्राणाची बाजी लावली, आता मात्र अंमलबजाणी करत नाहीत हे जनता समजून चुकली आहे. राष्ट्रीय किसान संघटनचे प्रत्येक राज्यात काम असून ते आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याचा प्रसार करणार असल्याचे हजारे म्हणाले.