ऑक्टोबर सरल्यानंतरही पाच नद्यांचे पाणी न अडविल्याचा शेतकऱ्यांना फटका; परतीच्या पावसाच्या पाण्याचा अंदाज घेऊन कार्यवाहीचा प्रशासनाचा निर्णय

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :  तालुक्यातील वैतरणा, तानसा, पिंजाळी, गारगाई आणि देहेर्जा या पाच नद्यांमधील पाणी ऑक्टोबरमध्ये  साठविण्यासाठी पाटबंधारे विभागाने विविध ठिकाणी वाडा तालुक्यात ५०हून अधिक ‘कोल्हापूर टाइप’ (केटी) बंधारे बांधले आहेत. मात्र दरवर्षी या बंधाऱ्यांचे दरवाजे पाटबंधारे विभागाकडून वेळीच बंद केले जात नसल्याने अनेक भागांत पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नद्यांचे पाणी अडवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नद्या कोरडय़ा पडतात. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. बंधाऱ्यांत पाणीसाठा झाल्यास परिसरातील विहिरी, कूपनलिका यांची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असते. मात्र, नद्यांचे पाणी अडविण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  तालुक्यात तानसा नदीवर जाळे, उचाट, मेट,  तर वैतरणा नदीवर बालिवली, तिळसा, गातेस, घोडमाळ, सांगे, हमरापूर आणि पिंजाळी नदीवर सापणे, पाली, आलमान  येथे, तसेच गारगाई नदीवर गारगांव, शिलोत्तर, पीक याशिवाय देहेर्जा नदीवर सावरोली, ब्राह्मणगांव या प्रमुख येथे ‘कोल्हापूर टाइप’ बंधारे बांधलेले आहेत. या बंधाऱ्यांचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस काढून ठेवले जातात व ऑक्टोबर महिन्यात पाणी अडविण्यासाठी पुन्हा लावले जातात. मात्र ऑक्टोबर महिना संपला तरी आजपर्यंत एकाही बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत.

अडवले तरी गळतीच

गेल्या १५ वर्षांत वाडा तालुक्यातील पाचही नद्यांवर बांधलेल्या प्रत्येक बंधाऱ्यात गळतीचे प्रमाण अधिक  आहे. ही गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. तसेच फायबरचे दरवाजे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत, लोखंडी दरवाजे गंजलेले आहेत. त्यामुळे गळतीचे प्रमाण अधिक आहे.  तालुक्यातील पाली येथे महाराष्ट्र शासन लघु पाटबंधारे विभाग वाडा यांनी बांधलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे बसविण्यात न आल्याने बंधाऱ्यातून रोज लाखो लिटर पाणी वाया चालले आहे. पाली येथील बंधाऱ्याचे दरवाजे बंद न केल्यास त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी दिला आहे.

परतीच्या पावसामुळे नदीपात्रांतून भरपूर पाणी वाहत आहे.  त्याचा अंदाज घेऊनच दरवाजे बंद केले जातात.

– एम. आर. पाटील, समन्वयक लघु पाटबंधारे विभाग वाडा