पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा व वारणा या नद्यांच्या पाणी प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. याचा फटका प्रामुख्याने कोल्हापूर, इचलकरंजी या जिल्ह्य़ातील मोठय़ा शहरांना बसत आहे. दूषित पाणीपुरवठय़ामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्य़ातील जलसाठे आत्यंतिक प्रदूषित होऊन जलचर मृत्युमुखी पडत आहेत. अशा स्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र विश्वामित्री पवित्रा घेऊन जनतेची परवड पाहत आहे. या आठवडय़ाभरात पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने गाजतो आहे. जयंती नाल्यातील दूषित पाणी येथील पंचगंगा नदीपात्रात मिसळत आहे. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन त्याला एक प्रकारचा दर्प जाणवत आहे. पाण्यावर हिरव्या रंगाचा तेलकट तवंग आला आहे. नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता वाढल्याने मासे मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत.
पंचगंगेच्या दूषित पाण्याचा फटका शहरवासियांना सातत्याने बसत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या महापालिकेच्या सभेत याच प्रश्नावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासन व पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले होते. प्रशासनाकडून सुधारणा करण्याचे आश्वासन दिले असले तरी परिस्थितीमध्ये मात्र फारसा फरक पडलेला नाही. महिन्याभरात जयंती नाल्यातील मैलामिश्रित पाणी दोनवेळा नदीमध्ये मिसळले आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे इचलकरंजी शहराचा पंचगंगेतून पाणी उपसा करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. ३ लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहराला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी नागरिकांना ऐन उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. वस्त्रनगरीला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. पण कृष्णेचे नदीपात्रही दूषित झालेले आहे. सांगलीतील शेरी नाल्याचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने कृष्णा नदीची गटारगंगा झाली आहे. अशाही स्थितीत कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्याचा प्रयत्न इचलकरंजी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा असला तरी जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने पाणीपुरवठा खंडित होणे हे कायमचे ठरले आहे. 
दूधगंगा नदीला प्रदूषणाची बाधा फारशी झालेली नाही. पण या महिन्याभरात दूधगंगेचे पात्रही दोनदा प्रदूषित झाल्याने नदी काळवंडली आहे. नदीतील मासे मरण्याचे प्रकारही घडले आहेत. दूधगंगा दूषित झाल्याने धरणातून पाणी सोडून ती प्रवाहित ठेवण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीकाठच्या गावांसाठीही उद्भवली असून पंचगंगा नदीत धरणातील पाणी सोडून ती प्रवाहित करण्याची गरज निर्माण झाली आहे. दालमिया शुगर्स प्रकरणामुळे वारणा नदीही अलीकडे प्रदूषित बनलेली आहे. जिल्ह्य़ातील चार प्रमुख नद्यांना प्रदूषणाने वेढले असतांना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र आक्रमक भूमिका न घेता धिम्मपणे बसून राहिले आहे. दोन वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे इचलकरंजी परिसरातील ३५ जण काविळीने दगावले होते. अशीच कटू परिस्थिती उद्भवल्याशिवाय जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे डोळे उघडणार नाहीत का, असा खडा सवाल नागरिकांतून उमटत आहे.