|| सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील ४७ तालुक्यांत दुष्काळाची दाहकता भीषण, चारापाण्यासाठी दुष्काळग्रस्त हतबल

बहुतांश शिवार उघडे- बोडके, काही ठिकाणी करपलेली पिके. गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झालेला टँकर पावसाळ्यातही सुरूच. आता तर जनावरांना पाणी पाजायचे म्हटले तरी चार किलोमीटरचा प्रवास. जगण्याची उमेद बांधायची ती कशाच्या आधारावर, असे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. त्यामुळे जनावरांना टिकवायचे असेल तर ऊसतोडीला जाणाऱ्या व्यक्तीच्या हाती जनावर द्यायचे, त्याला सांगायचे, ‘चारा-पाणी कर आणि साखर कारखान्यावरुन परत आल्यावर बैलजोडी तेवढी परत कर’ अशी दाहकता आहे दुष्काळाची.

मराठवाडय़ात सर्वात कमी पाऊस पडलेल्या गारज आणि जिरी-मनोली, कविटखेडा गावांमध्ये ‘हवालदिल’ शब्दाचा खरा अर्थ उमगतो. ‘कोणी तरी सांगा की सरकारला, आमच्या हाताला काही तरी काम द्या म्हणावं. आता शेतीतून तर काही म्हणता काही येणार नाही. जगायचं कसं, तुम्हीच सांगा.’ जरी या गावातील केशव शंकर भवर यांचा हा सवाल दुष्काळाची दाहकता व्यक्त करणारा. केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाडय़ातील गंभीर दुष्काळ असलेल्या २७ आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असलेल्या २० तालुक्यांमध्ये हीच स्थिती आहे.

मृगात पाऊस झाल्यानंतर केशव भवर यांनी तीन एकरात कापूस लावला. तो उगवला खरा, पण वाढ काही झाली नाही. मग कापूस मोडला. त्याच जमिनीवर मका लावला. त्याची वाढ पिंढरीपर्यंत झाली. पुढे वाढ झाली नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता. मका काढून जनावरांना घातला. त्याच शेतात बाजरी लावली. कापसाचे तीन हजार, मक्याचे तीन हजार आणि पुन्हा दोनएक हजार रुपये खर्च झाला. तीन वेळा पेरूनही हाती काही आले नाही. जिरी गावचे सरपंच कारभारी शिंदे सांगत होते, ‘गावातल्या प्रत्येक माणसाने तीनदा पेरले. कारण हवामान खात्याचा अंदाज यायचा, पाऊस पडेल. जुने पीक मोडायचो, नवीन पीक लावायचो. पण हाती काही लागले नाही. पुढे खत आणि औषधे देणेही बंद केले. खत दुकानदाराला परत केले. आता हाताला काम नाही. टँकरचे पाणी भरायचे आणि दिवस ढकलायचा. जनावरांना पाणी पाजायचे असेल तर जवळच असलेल्या बोलठाणे या गावापर्यंत जायचे. नाशिक जिल्ह्य़ातील या गावांतून पाणी आणायचे आणि छोटय़ा जनावरांना पाजायचे.’

ग्रामीण भागातील अर्थकारण आता आक्रसले आहे. बापू पुंडलिक सूर्यवंशी यांच्याकडे दोन बैल आणि दोन गायी आहेत. बैलांना काम नाही. चारा नाही. त्यामुळे ऊसतोडीला जाणाऱ्या नंदू पवारकडे त्यांनी त्यांचे दोन बैल दिले. एरवी ते त्यांच्याकडून पैसे घेत. या वेळी जनावरांना चारा घाल, पाणी पाज. ऊसतोडीवरून परत आल्यावर बैल परत कर, अशी बोलणी केली आणि किमान बैल जगला पाहिजे, याची तजवीज केली. ज्यांना हे शक्य झाले नाही, त्यांची चारा छावण्यांची मागणी आहे. चारा छावणीला की दावणीला असा वाद घडवत छावणी देण्याऐवजी अनुदान देऊ, अशी भूमिका परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ात व्यक्त केली होती. त्यावरही काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आता प्रयोग करू नका. जनावरांना चारा आणि पाणी आवश्यक आहे.’ गावात महिला टँकरचे पाणी कधी येईल याची वाट पाहत होत्या. प्रत्येक घरासमोर प्लास्टिकचे ड्रम ठेवले आहेत. टँकरने पाणी आले की, त्यात ओतून घ्यायचे. दोन-तीन दिवस कसेबसे काढायचे. गावात आता प्रत्येकाकडे शौचालय आहे. बहुतेकांनी ते वापरायचे बंद केले आहे. पाणीच नाही तर ते कसे वापरणार, असा प्रश्न विचारला जातो.

जीनिंग मिलमध्ये शुकशुकाट

दुष्काळी भागातल्या बहुतांश जीनिंग मिलमध्ये शुकशुकाट आहे. जिथे ट्रक भरून भरून कापूस यायचा तिथे दुचाकीवर एखादे पोते कापूस आणला जातो, त्याचे मिळेल ते पैसे घेतले जातात. तेवढय़ावर पुढचे ११ महिने काढायचे कसे, असा सवाल केला जात आहे. दुष्काळाची जाणीव सरकारला असली तरी त्याची दाहकता अजूनपर्यंत प्रशासनाने पोहोचवलेली नाही. परिणामी उपाययोजनांचा मेळ अजूनही कागदोपत्रीच आहे. मराठवाडय़ात आजघडीला २३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.