|| तुकाराम झाडे

कामे निकृष्ट, कोरडीठाक बंधारे, पाणीपातळीत घट

जिल्ह्यात जलयुक्तचा मोठा गाजावाजा झाला. कोटय़वधी रुपये खर्च झाले. यातून हाती काय लागले हा आहे. पाणीपातळीत घट झाली असून येत्या काळात पाणीबाणीचे संकट तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. त्याला काही कारणे सांगितली जात आहेत. जलयुक्तची निकृष्ट कामे, बंधाऱ्यांमध्ये वाढलेले गाळाचे प्रमाण आणि पाऊसमान अत्यल्प झाल्याने बंधारे नोव्हेंबरमध्येच कोरडेठाक पडले आहेत.

सेनगाव तालुक्यातील खुडज शेतशिवारात ३० वर्षांपूर्वी पाझर तलाव बांधण्यात आला. त्याखाली पुसेगाव जलयुक्त शिवारचा १ बंधारा बांधण्यात आला. त्या शिवारात जलयुक्त संधारण विभागाच्या वतीने बंधारा बांधला. त्यात आज ३ फूट पाणीसाठा आहे. तर बाजूला धाबे यांच्या शेतात असलेल्या विहिरीची पाणीपातळी समाधानकारक आहे. उपरोक्त तलावाचा निश्चितच या विहिरीला लाभ झाला.

एक वर्षांपूर्वी पुसेगावनजीक जलयुक्त शिवार अभियानामध्ये सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. त्यावर १५.६८ लाख खर्च झाला. बंधाऱ्याची लांबी २४ मीटर पाणीसाठा क्षमता ११.४५ टीसीएम, या बंधाऱ्याच्या पाण्यातून ५ हेक्टर सिंचन क्षमता दर्शवली होती. आज या बंधाऱ्यात बराच गाळ असल्याने त्यातील पाण्याला डबक्याचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. या बंधाऱ्यातून ना पिण्यासाठी ना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होत नाही.

परिणामी, त्यावर झालेला खर्च पाण्यात गेला. या बंधाऱ्याचे प्रत्यक्ष खोलीकरणाचे काम झाले नाही व काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे शेख वहीद रहेमान या शेतकऱ्याने सांगितले.

पुसेगावपासून काही अंतरावर १३ लाख ७३ रुपये खर्चातून सिमेंट नाला बांध पुसेगाव क्र.८ चे काम झाले. लांबी १६ मीटर तर पाणीसाठा ७.३५ टीसीएम होणार असून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ३ हेक्टर सिंचन क्षमता असल्याचे सांगण्यात आले. या बंधाऱ्याचे काम २१ मार्च २०१७ ला पूर्ण झाले. परंतु, पाणीसाठा होण्यापूर्वीच सिमेंट नाला फुटून वाहून गेला. त्यामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच, मात्र यावर शासनाने केलेला खर्च पाण्यात गेला.  वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली नाही, असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाच एकरातील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी नारायण देशमुख यांनी दिली. तर याच नाला बांधाच्या बाजूला अजहर पाशा देशमुख यांच्या शेतीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यत जलयुक्त शिवार अभियान कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग, भू-जल सर्वेक्षण अशा विविध विभागांकडून कामे हाती घेण्यात आली होती. वन विभागाकडून सेनगाव तालुक्यात घेण्यात आलेल्या काही मातीनाले बांधचे काम उत्कृष्ट झाले. परंतु, परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे अनेक बंधारे कोरडेठाक पडले आहेत.

असे कोटय़वधी खर्च

सन २०१५-१६ मध्ये १२४ गावांमध्ये ४०८७ कामे पूर्ण झाली. ८२.५४ कोटी खर्च करण्यात आला. सन २०१६-१७ मध्ये शंभर गावामध्ये ४१०४ कामे पूर्ण करण्यात आली. त्यावर ५३.४२ कोटी खर्च झाले. सन २०१७-१८ मध्ये ८० गावांत २०९२ कामे पूर्ण झाली आहेत. १३४ कामे प्रगतिपथावर आहेत. कामावर १५.८४ कोटी खर्च झाले. तर सन २०१८-१९ मध्ये ११५ गावांमध्ये १९३३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ८५ टक्के भौतिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आतापर्यंत ३०१ कामे पूर्ण झाल्याच्या नोंदी प्रशासनाच्या दफ्तरी आहेत.