25 April 2019

News Flash

पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

मराठवाडय़ासह राज्यातील दुष्काळी भागाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी

मराठवाडय़ासह राज्यातील दुष्काळी भागाची केंद्राच्या पथकाकडून पाहणी

कोरडाठाक पडलेला गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी प्रकल्प. दुष्काळ पाहण्यासाठी केंद्रीय पथकाच्या गाडय़ा धुराळा उडवत आल्या. तेव्हा केंद्रातल्या सचिवाला गावातल्या सरपंचाची विनंती होती, जवळच्या एखाद्या प्रकल्पातून पाणी आणता येईल का याचा अभ्यास तरी करायला सांगा. तर शिष्टमंडळाने भेटी दिलेल्या अन्य गावांतही उत्पादन कमालीचे घटल्याचे सांगत पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, अशी तक्रार गावोगावी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आली.

‘४० गावांचा पाणीपुरवठा करणारी योजना टेंभापुरी प्रकल्पात होती. आतापर्यंत जलयुक्त शिवाराची चार-पाच कोटींची कामे झाली आहेत. पूर्वी ऊस, कापूस घ्यायचो. आता काही शिल्लक नाही. एखाद्या कॅनॉलमधून पाणी आणता येऊ शकते का, याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमा,’ अशी विनंती सरपंच संतोष खवले आणि शिवप्रसाद अग्रवाल यांनी केली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या प्रमुख छावी झा यांच्या उपस्थितीत गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी, मुरमी, सुल्तानपूर या गावांना भेटी देण्यात आल्या. तेव्हा उत्पादन कसे घटले आणि पाण्याची किती कमतरता जाणवत आहे, याची माहिती गावकऱ्यांनी पथकाला सांगितली. ‘पिण्याला पाणी शिल्लक राहिले नाही. दोन बैल आणि एक गाय आहे. एक एकर रान आहे. त्यात कापूस घेतला होता. मिळाले फारसे काही नाही. गावात टँकरने पाणीपुरवठा होतो आहे, पण जनगणनेच्या हिशेबात पाणी दिले जाते. जनावरांच्या पाण्यांचे हाल आहेत,’ असे मुरमी गावचे सरपंच विक्रम राऊत सांगत होते. आता गावोगावी हागणदारी मुक्तीचा कार्यक्रम जोरदारपणे झाला. त्यालाही पाणी लागते. पण पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. सध्या टँकरने प्रतिव्यक्ती २० लिटर पाणी मिळत आहे. ते ४० लिटर असावे, अशी मागणी त्यांनी केंद्रीय पथकासमोर केली. टँकरमधून होणारा पाणीपुरवठा वाढवायला हवा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडेही नोंदविल्याची माहिती दौऱ्यात सहभागी असणाऱ्या जि. प.च्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी दिली.

जिकठाण संयुक्त ग्रामपंचायतीमधील सुल्तानपूरमधील शेतकरी बाबुलाल शेख याने कापूस आणि तुरीचे कसे नुकसान झाले आहे, याची माहिती केंद्रीय पथकाला दिली. बहुतांश ठिकाणी रोजगार हमीची कामे उपलब्ध होत नाही, असेही सांगण्यात आले. कोणाचा ऊस वाळून गेलेला, तर कोणाचा कापूस हातीच न आलेला अशी पीक स्थिती केंद्रीय अधिकाऱ्यांनीही पाहिली. ग्रामीण भागातील पीक परिस्थिती पाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सहसचिव छावी झा म्हणाल्या, आम्ही पाहणी करत आहोत. सर्व ठिकाणचा अभ्यास एकत्रित केल्यानंतर सरकारला अहवाल देऊ. त्यानंतर निर्णय घेतले जातील.

ग्रामीण भागातील पीक पाहणी करण्यापूर्वी मराठवाडय़ासह राज्यातील दुष्काळाची एकूण स्थिती केंद्रीय पथकासमोर ठेवण्यात आली. पुणे व अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त तसेच औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दुष्काळाची तीव्रता आणि केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती पथकाला दिली.

First Published on December 6, 2018 12:57 am

Web Title: water scarcity in maharashtra 36