एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात रायगड जिल्ह्य़ातील अनेक भागात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. यात जिल्ह्य़ातील ३२ गावे आणि १०५ वाडय़ांचा सभावेष आहे. या टंचाईग्रस्त गावांना सध्या १८ खाजगी टँकर्सच्या मदतीने पाणी पुरवठा केला जातो आहे.
जिल्ह्य़ातील पेण, महाड आणि कर्जत तालुक्यातील अनेक भागांनी भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाड तालुक्यातील कोथुर्डे धरण पुर्णपणे आटले आहे. तर कुर्ला धरणातील पाणी साठा संपत आला आहे. त्यामुळे महाड शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. धरणांमध्ये काही दिवस पुरेल येवढाच पाणीसाठा शिल्लक राहील्याने आगामी काळात महाडकरांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पेण तालुक्यातील खारेपाट विभागालाही सध्या भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ३९ गावे ९१ वाडय़ा पाणी टंचाईच्या रडारवर आहेत. यात भाल, विठ्ठलवाडी, कान्होबा, काळेश्री, लाखोले, बहीराम कोटक या गावांचा समावेष आहे. या गावांना शहापाडा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.
रायगड जिल्हा परिषदेने पाणी टंचाई निवारणासाठी ६ कोटी ३ लाख ९२ हजार रुपयांचा पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखडय़ाच्या पहील्या टप्प्यात कोणतेही काम झाले नाही. दुसऱ्या टप्प्या २३ गावातील पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तीन गाव आणि एका वाडीला तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येणार आहे. १२८ गावे आणि ३६२ वांडय़ांसाठी विंधण विहीरी मंजुर करण्यात आल्या आहे. या शिवाय ५ गाव आणि तीन वाडय़ांमधील विंधण विहीरींचे जलभंजन करण्यात आले आहे. या कामासाठी ३ कोटी ६७ लाख ७३ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
कृती आराखडय़ाच्या तिसऱ्या टप्प्यात ९४ गावे आणि १९० वाडय़ांना टँकर्सने पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय १०० गावे आणि १९० वाड्यांसाठी विंधण विहीरींची तरतुद करण्यात आली आहे.
वाढते तपमान आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी पुरवठय़ासाठी जादा टँकरने पुरवठा करावा लागणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून पाणी टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात असला तरी सध्या मात्र हंडाभर पाण्यासाठी पायपिट करण्याची वेळ आल्याचे चित्र पहायला मिळते आहे.