उन्हाचा पारा गेल्या १५ दिवसांपासून ४१ अंशांवर पोहोचला असतानाच दुष्काळातील नसíगक पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. एप्रिलच्या मध्यावरच जिल्ह्य़ातील अडीच लाखांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असून जिल्ह्य़ातील पाचपैकी चार मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा संपला असून ८४ तलावांपकी ४१ तलाव कोरडे पडले आहेत. विहिरीने तळ गाठून महिना उलटला असून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात वारणा, मोरणा, कृष्णा या नद्यांचे पाणी असल्याने फारशी टंचाई जाणवत नसली तरी जत, तासगाव पूर्व, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस भेडसावत आहे. आजच्या घडीला या चार तालुक्यांमध्ये ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार टँकरची संख्या या महिनाअखेर शतक ओलांडेल, तर मेअखेपर्यंत १७० गावे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या आश्रयाखाली येतील.

वाढत्या उन्हाच्या तडाख्यात जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन मोठय़ा प्रमाणात पाणी कमी होत आहे. जिल्ह्य़ात सिद्धेवाडी, बसप्पावाडी, दोड्डनाला आणि मोरणा हे मध्यम प्रकल्प असून यांपकी केवळ मोरणा प्रकल्पामध्ये २.४३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. मात्र अन्य प्रकल्पांतील पाणीसाठाच संपला असून पाणीपातळी मृतसंचयाकडे पोहोचली आहे.

जिल्ह्य़ात पलूस वगळता अन्य तालुक्यांत ८४ लघुप्रकल्प म्हणजेच तलाव आहेत. या तलावांची साठवणक्षमता नऊ हजार ४४० दशलक्ष घनफूट असली तरी यामध्ये केवळ ८०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या १७ टक्के पाणीसाठा उरला असताना अद्याप दोन महिने या साठय़ावर गुजराण करावी लागणार आहे. यातच उन्हाच्या तीव्रतेने दररोज पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे.

आटपाडी, जतमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा हा दर वर्षीचा खेळ असला तरी योग्य नियोजनाचा अभावही जाणवत आहे. जतच्या काही भागात म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध करता येऊ शकते. मात्र मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतच या पाण्याचा वापर शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात केला जात असल्याने जत तालुक्यात पाणीच पोहोचत नाही. याला पाटबंधारे विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप खुद्द आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे.

जतच्या पूर्व भागात टँकरमध्ये भरण्यासाठी पाण्याचे स्रोतही जवळपास उपलब्ध नाहीत, यासाठी तातडीने म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध करण्याची मागणी प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडेच केली आहे. आटपाडी तालुक्यात काही प्रमाणात टेंभूचे पाणी उपलब्ध असले तरी तेही सांगोल्याला जादा प्रमाणात सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेतच, पण स्थानिक पातळीवर आज विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी अख्खा दिवस रानोमाळ िहडावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

गावपातळीवर टँकर अथवा अन्य पर्याय शासनाकडून केले जात असले तरी रानात वस्तीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे. रानातील विहिरीचे पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा गाव जवळ करावे लागत आहे. याचबरोबर जनावरांसाठी पाण्याचे काय करायचे हा प्रश्नही आ वासून उभा आहे.

११४ टँकर्सनी पाणीपुरवठा

जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईनिवारणार्थ ११३ टँकरद्वारे ११४ टंचाईग्रस्त गावांतील ७६९ वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली.