शहरासाठी सुजल निर्मल अभियान शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटी खर्च करूनही डहाणू शहराच्या पाण्याचा प्रश्न पूर्ण सुटलेला नाही. पश्चिाम भागातील ईराणी रोड, घाचीया, वडकून, आगर, पारनाका, प्रभुपाडा येथील संकुलांना केवळ अर्धा तास पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.

साखरा धरणातून सरावली-सावटामार्गे जलवाहिनी टाकून डहाणू शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डहाणू नगर परिषदेने आखला आहे. त्यातील त्रुटी दूर करून डहाणूच्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सन २०१३ मध्ये सुजल निर्मल अभियान शहर पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. यानुसार मुख्य संतुलित जलकुंभासह डहाणू शहरात मसोली प्रभुपाडा, वडकूण जलकुंभ, केटीनगर उंच जलकुंभ, लोणीपाडा उंच जलकुंभ, सरावली उंच जलकुंभ, डहाणू गावठाण उंच जलकुंभ असे सहा जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या योजनेतून डहाणू पूर्वेकडील रहिवासी संकुलांना पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होत आहे. मात्र पश्चिामेकडे अनेक कामे अपूर्ण राहिल्याने केवळ अर्धा तास पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. याविषयी नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी पाण्याचा नियमित पुरवठा सुरू असून पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले.