तालुक्यात अनेक गावांचा पाणीटंचाईशी सामना; लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा :    वाडा तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण आणि धडपड सुरू आहे. अशीच पाण्यासाठी धडपड करताना  एका महिलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना वरसाळे गावात घडल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

वाडा तालुक्याला बारमाही साठा असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळी, गारगाई व देहेर्जा या पाच नद्यांची देणगी मिळालेली आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे दुर्लक्ष व नियोजनाचा अभाव यामुळे वाडा तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात तीन टँकरद्वारे १७ पाडय़ांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात  तालुक्यातील दुर्गम भागातील मांगरुळ ग्रामपंचायत क्षेत्रातील नवापाडा येथील राही किनर ही महिला  विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती.  विहिरीत  तोल जाऊन पडल्याने ती  गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. अशा घटना घडत असतानाही पाणीटंचाई समस्येबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  त्याची दखल घ्यावी  तसेच भीषण पाणीटंचाईच्या गावांत तात्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान या महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी व अन्य वैद्यकीय  खर्चाची तयारी जिजाऊ  शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी घेतली आहे.

तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टँकर सुरू असून ज्या ठिकाणी टँकरची गरज भासेल त्या ठिकाणी नियमांना अधीन राहून टँकर सुरू करण्यात येतील.

  -पल्लवी सस्ते, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाडा.