23 April 2019

News Flash

जळगाव जिल्ह्यतील ८८९ गावांवर पाणीटंचाईचे संकट

पाण्याची तजवीज करताना वधू पक्षाची दमछाक होत असून त्यांना आर्थिक तोषिशही सहन करावी लागत आहे.

जळगावसह राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा दिवसागणिक उंचावत आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. एप्रिलच्या मध्यावर जळगाव जिल्ह्यतील ८८९ गावे पाणीटंचाईच्या छायेत आहेत. त्यातील ७७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. राज्यातील अनेक भागांत कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती असून पाणीटंचाईच्या झळा जनावरांनाही बसत आहे. दुसरीकडे लग्नकाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. पाण्याची तजवीज करताना वधू पक्षाची दमछाक होत असून त्यांना आर्थिक तोषिशही सहन करावी लागत आहे.

प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार, एप्रिल ते जून या काळात २७१ गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे २९ कोटी ५० लाखांचा आराखडा मंजूर केला आहे. सद्य:स्थितीत अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ४१ गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या तालुक्यात १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जामनेर तालुक्यात १८ गावांना १३ टँकर तर भुसावळ, बोदवड, पाचोरा तालुक्यांत प्रत्येकी एक टँकर, पारोळा तालुक्यात १४ गावांमध्ये सहा टँकर असे सध्या ७७ गावांमध्ये ३९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचे भीषण संकट लक्षात घेऊन प्रशासनाने विंधन विहिरी, कूपनलिकांचे अधिग्रहण सुरू केले आहे. अनेक गावांमधील सार्वजनिक, खासगी विहिरींचे खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठय़ासाठी २० कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

अमळनेर, जामनेर, पाचोरा, एरंडोल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. नळाला तब्बल २० दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना पाणी विकत घ्यावे लागते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत ६२ गावांमध्ये १६७ विंधन विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली. त्यातील केवळ १४ कामे झाली असून १५३ विहिरींची कामे अद्याप अपूर्ण आहे. कूपनलिकांसाठी १५ गावांमध्ये ३६ कामे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दोनच कामे झाली असून ३४ कूपनलिकांची कामे अपूर्ण आहेत. या दिरंगाईमुळे सर्वसामान्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामीण भागात टळटळीत ऊन असले तरी विवाह सोहळ्यातील उत्साह कमी होत नाही. या सोहळ्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे. ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यात हजारो वऱ्हाडी उपस्थित असतात. सध्या दैनंदिन पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना अशा सोहळ्यात पाण्याची तजवीज करताना वधूपक्षाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. विवाह सोहळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खरेदी करणे, टँकर मागविणे या पर्यायांशिवाय गत्यंतर नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

पाणीटंचाई कार्यक्रम रखडला

पाणीटंचाई कार्यक्रमात जिल्ह्यत विहीर खोलीकरण, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती अंतर्गत ५९ गावांमध्ये एकूण दोन कोटी ४२ लाख ४३ हजार ९३४ रुपयांची ५९ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे त्यास प्रशासकीय मान्यता नसल्याने ही कामे सुरूच झाली नसल्याचे उघड झाले आहे.

जलयुक्तच्या कामांवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा दोनमध्ये ५७ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून ५५७ कामे घेण्यात आली असून त्यापैकी ५४२ कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील तीन हजार ५५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तरीदेखील टंचाईची समस्या कायम असल्याने या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

First Published on April 17, 2018 4:33 am

Web Title: water scarcity issue in jalgaon district