कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली असून राज्यात जास्त मागणी असलेल्या काळात आवश्यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात वीजटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे. सद्य:स्थितीत केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊ स लांबल्यास त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून सिंचन व वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. तसे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे.

या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशानुसार केले जाते. ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीजप्रकल्पासाठी, तर ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी देण्यात येतो. धरणातून आतापर्यंत ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १००, तर धरणाच्या आपत्कालीन विमोचक दरवाजातून १ हजार, असे एकूण ३ हजार १०० क्युसेक्स पाणी दररोज देण्यात येते. पायथा वीज गृहातून आतापर्यंत ३३.३९ टीएमसी तर आपत्कालीन विमोचक दरवाजातून ४.११ असा  एकूण ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना प्रकल्पाने तयार केलेल्या पाणी वाटप आराखडय़ानुसार ६६.२ टीएमसी पाणी प्रस्तावित केले आहे. महानिर्मिती कंपनीने ६१.९४ टीएमसी पाण्याचा वापर करून ४.०८ टीएमसी पाणीसाठय़ाचा वापर शिल्लक ठेवला आहे. पूर्वेकडे व पश्चिमेकडे धरणातून पूर्णक्षमतेने पाणी वापर होत असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली आहे. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडता येणार नाही. पाण्याचे नियोजन न झाल्यास वीजनिर्मिती बंद करण्याचा धोका आहे. याबाबतची सूचना महानिर्मिती कंपनीला पत्राद्वारे देण्यात आली आहे, असे कोयना सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी सांगितले.

जलस्थिती..

धरणात सध्या १९.५१ टक्के पाणीसाठा असून त्यातील १४.३९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. ३१ मेपर्यंत धरणातील पाणी सोडण्यात यावे, अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाने केली आहे.