कधी भंडारवाडी, तर कधी उजनी!

महिन्यातून जेमतेम तीनदा होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून लातूरकरांची सुटका व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याचा आणि ध्योयधोरणाचा अभाव या चक्रात कधी भंडारवाडी, तर कधी उजनी असा लातूरचा पाणीप्रश्न हेलकावे खात आहे.
लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या तीन वर्षांपासून कायम आहे. कोणत्याही स्थितीत शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा सत्तेतील मंडळी वारंवार करतात. गतवर्षी रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणातील पाणी लातूरकरांना पिण्यासाठी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. पण, महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे पाणी व निधी दोन्ही उपलब्ध असताना भंडारवाडीचे पाणी लातूरकरांना मिळालेच नाही.
लातूरकरांच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शहराला प्रसंगी रेल्वेने पाणीपुरवठा केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून बंद वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. उस्मानाबाद शहराला उपलब्ध पाणीसाठा अधिक आहे. शहराची गरजही कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ८ एमएलडी पाणी देता येणे शक्य आहे. उस्मानाबादहून धनेगाव धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करणारी बंद वाहिनी जाते. या मार्गातील शिराढोणपर्यंत ३० किलोमीटर वाहिनीचे काम पूर्ण करून लातूरकरांना उजनीचे पाणी दिले जाणार असल्याची घोषणा नव्या सरकारने वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन लातुरात केली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर यांनी या साठी २७० कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आल्याचे जाहीर केले.
गतवर्षी रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणाचे पाणी लातूरकरांना उपलब्ध करण्यासाठी आठ वेळा कामाच्या निविदा काढल्या. मात्र, एकाही कंत्राटदाराने निविदा भरल्या नाहीत. परिणामी ही प्रक्रियाही रखडली. आता नव्याने धनेगाव धरणक्षेत्रात मोठा पाऊस पडून पाणीसाठय़ात वाढ होण्याची सुतराम शक्यता नाही. लातूरकरांना पाणी देण्यासाठी शासनस्तरावर जलदगतीने कारवाई होण्याची गरज आहे; अन्यथा पूर्वीच्या सरकारच्या घोषणेप्रमाणेच नव्या सरकारची ही घोषणाही हवेतच विरेल व उन्हाळय़ात पाण्यासाठी लातूरकरांची त्रेधा उडेल.

निविदा प्रक्रियेचा कोलदांडा
धनेगाव धरणात बुधवापर्यंत ४.१८ दलघमी इतकाच अचल साठा उपलब्ध आहे. हे पाणी कसेबसे येत्या फेब्रुवारीपर्यंत पुरेल. मार्चनंतर धनेगाव व्यतिरिक्तचे पाणी लातूर शहराला लागणार आहे. या तीन महिन्यांत उस्मानाबाद ते शिराढोण ही ३० किलोमीटर अंतराची जलवाहिनी पूर्ण व्हायला हवी. त्यासाठीची निविदा प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण झाली तरच हे काम वेळेत होईल. या ना त्या कारणाने या कामास उशीर झाला तर उजनीचे पाणी बंद वाहिनीतून लातूरकरांना मिळणार नाही. त्यामुळे ते पुन्हा रेल्वेने आणण्याच्या चच्रेला फोडणी मिळेल.