21 January 2018

News Flash

पर्यटनस्थळांनाही पाणीटंचाईचा फटका!

दुष्काळाच्या वणव्यात ऐतिहासिक बीबी का मकबरा येथील विहीरही आटली. कूपनलिकेचे पाणी कमी झाले. परिणामी परिसरातील सुमारे दोन हजार झाडे जगवायची कशी, यावर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद | Updated: January 24, 2013 2:20 AM

दुष्काळाच्या वणव्यात ऐतिहासिक बीबी का मकबरा येथील विहीरही आटली. कूपनलिकेचे पाणी कमी झाले. परिणामी परिसरातील सुमारे दोन हजार झाडे जगवायची कशी, यावर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी खल करीत आहेत. बीबी का मकबऱ्यासह दौलताबाद किल्ला, वेरुळ व अजिंठा येथेही यंदा मोठी पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे पर्यटन केंद्राच्या भोवतालची उद्याने वाचविण्यासाठी, पाणी मिळविण्यास अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बीबी का मकबरा येथील आठ एकर क्षेत्रावरील हिरवळ टिकविणे मोठे अवघड काम झाले आहे.
बीबी का मकबरा येथे ऐतिहासिक चार-बाग मोगल गार्डन आहेत. बागेत वेगवेगळी दोन हजार झाडे आहेत. लिंबू, मोसंबी, सीताफळ, रामफळ व आंबा ही झाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. यातील बहुतांश झाडे तीन ते चार वर्षांची आहेत. गेल्या आठवडय़ात मकबऱ्यातील पाणीपुरवठय़ाच्या दोन विहिरींपैकी एक विहीर कोरडी पडली, तर दोन कूपनलिका आटल्या. आता बागेत हिरवळ राहिली नाही तरी चालेल, किमान झाडे तरी जगवू या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.
पुरातत्त्व विभागाकडे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन टँकर आहेत. गरज लागेल तसे खासगी टँकरने पाणी आणले जाते. या वर्षी २० वेळा खासगी टँकर मागवावे लागल्याचे अधिकारी सांगतात. मकबऱ्यातील दोन हजार झाडे जगविण्यासाठी अन्य एका विहिरीतील गाळ काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. दरवर्षी बीबी का मकबरामध्ये एप्रिलअखेर व मे महिन्यात पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे आता झाडे टिकविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

First Published on January 24, 2013 2:20 am

Web Title: water shortage at tourist places
टॅग Tourist Places
  1. No Comments.