मागील तुलनेत यंदाच्या उन्हाळय़ात पाणीपातळी झपाटय़ाने खाली जात असून, गेल्या ५ वर्षांपेक्षा सरासरी पाणीपातळीत २.५५ मीटरने घट झाली आहे. आताच ही स्थिती असल्याने पुढचे ५ महिने काय चित्र असेल, या धोक्याची कल्पना यातून समोर येत आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्हय़ातील १०९ विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात आले. गेल्या ५ वर्षांत जानेवारीमध्ये जिल्हय़ाच्या पाणीपातळीत सरासरी ५.६३ मीटरने घट होते. या वर्षी ही घट ८.१८ मीटर असल्याचे समोर आले आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर मागील ५ वर्षांत ५.४७ मीटरने झालेली घट या वर्षी ७.७४ म्हणजे २.२७ मीटरने अधिक आहे. औसा तालुक्यातील १५ विहिरींच्या निरीक्षणांती मागील ५ वर्षांत सरासरी ७.२३ मीटरची घट १०.२१पर्यंत गेली. ती २.९८ ने अधिक आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींच्या निरीक्षणाअंती गेल्या ५ वर्षांतील ५.१० मीटर पाणीपातळी घटून आता ७.३३ इतकी खोली गेली आहे. ही घट २.२३ मीटरने अधिक आहे. लातूर तालुक्यातील १८ िवधनविहिरीच्या निरीक्षणानंतर ५ वर्षांत ५.३६ मीटरची पाणीपातळी ७.६२ मीटरवर पोहोचली. ही घट २.२६ मीटर आहे. निलंग्यात १७ विहिरींच्या निरीक्षणानंतर ५ वर्षांतील ६.८२ मीटरची पाणीपातळी ९.३३वर पोहोचली. ही घट २.५१ मीटरने अधिक आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर पाणीपातळी गेल्या ५ वर्षांत ६.२८ वरून आता ९.२० मीटरवर गेली असून घटीचे प्रमाण २.९२ मीटरने अधिक आहे. उदगीर तालुक्यात ९ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर गेल्या ५ वर्षांतील ५.५३ मीटर पाणीपातळी आता ७.३७ मीटर झाली. ही घट २.४ मीटरने वाढली. जळकोट तालुक्यात मागील तुलनेत पाणीपातळीतील घट या वर्षी उच्चांकी आहे. गेल्या ५ वर्षांत ५४५ मीटरची पाणीपातळी आता ९.७३ वर पोहोचली. ही घट तब्बल ४.२८ मीटरवर पोहोचली. देवणी तालुक्यात ८ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर ५ वर्षांतील ३.८५ मीटरची पाणीपातळी १.५९ मीटरने घटून ५.४४ वर पोहोचली. रेणापूर तालुक्यातील ११ िवधनविहिरींचे निरीक्षण केल्यानंतर ५ वर्षांत ५.१८ मीटर पाणीपातळीत घट झाली. आता ७.४८ इतकी घट झाली असून ती २.३०ने कमी झाली. गेल्या पाच वर्षांपेक्षा पाणीपातळीत यंदा तब्बल २.५५ मीटरने घट झाली. परिणामी येत्या ५ महिन्यांत ही घट किती होईल, याची चिंता लागली आहे.