वसमत येथील केंद्रीय नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी पालकांना ठरवून दिलेला वार म्हणजे रविवार. आई-वडिलांना काहीतरी घेऊन या असा हट्ट विद्यार्थी नेहमीच करत असतात. पण सध्या या शाळेतील विद्यार्थी पालकांना आवर्जून सांगत आहेत, रविवारी येताना पिण्यासाठी पाणी आणा हो! या विद्यालयात ५००हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन पालकांनीही ३० लीटरचे पाण्याचे कॅन विद्यार्थ्यांसाठी आणले होते.
पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती सर्वत्र आहे. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. हिंगोली जिल्हय़ातील वसमत येथील नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीपर्यंत ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून चालू वर्षांत ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यालयात प्रतिवर्षीच उन्हाळय़ाच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. या वर्षी त्याचे परिणाम एवढे आहेत, की विद्यार्थ्यांना पालकांना पिण्यासाठी पाणी आणा, असे सांगावे लागत आहे.
प्रशासनाने विद्यालय परिसरात सुमारे २०च्यावर िवधन विहीर घेतल्या. परंतु त्याला पाणी लागले नाही. पावसाळय़ात िवधन विहिरीतून पाण्याची सोय होते. मात्र उन्हाळा येताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. अजून जोरदार पाऊस न झाल्याने पाणीसाठय़ात वाढ झालेली नाही. परिणामी कसेबसे पाणी मिळवले जाते. सध्या ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.