निसर्गाचा अविभाज्य घटक आणि पर्यावरणातील बदलाची चाहूल देणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे अस्तित्व दिवसेंदिवस झपाटय़ाने घटत आहे. ज्या पक्ष्यांच्या स्थलांतरणावरून ऋतूंचे अंदाज बांधले जातात त्या पक्ष्यांचे अधिवास असलेल्या पाणस्थळांची दुरवस्था स्थलांतरणावर परिणाम करीत आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अधिवास संवर्धित करण्यासाठी यावर्षी राज्यात प्रथमच पाणपक्षी गणना घेण्यात आली. मात्र, या गणनेलाही राज्यातील अनेक जिल्ह्य़ात बगल देण्यात आली.
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. राणी दुर्गावतीने बांधलेल्या या पुरातन पाणस्थळांवर आजही स्थलांतरित पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य आहे. त्याचबरोबर नागपूर आणि अमरावती परिसरातही अनेक पाणस्थळे असून गेल्या २०-२५ वर्षांत शासनानेही अनेक तलावांची निर्मिती केली. मात्र, या तलावांवर झालेले बेशरम वनस्पतींचे आक्रमण आणि तलावांवर मोठय़ा प्रमाणावर होणारी मासेमारी स्थलांतरित पक्ष्यांना मागे फिरण्यास कारणीभूत ठरत आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती जिल्ह्य़ातील काही पाणस्थळांवर आजही येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. तरीही पाणस्थळांच्या होणाऱ्या दुरवस्थेवर लक्ष दिले गेले नाही, तर या पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या पाणस्थळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सिंचन खात्याकडील योजनेत निधीची तरतूद आहे. ही योजना अंमलात आणून त्यातील गाळ काढणे दूरच, पण पाणस्थळांच्या काठावरील बेशरम वनस्पतीही काढली जात नाही. त्यामुळे ही योजना आणि त्या योजनेंतर्गत मिळणारा निधी नेमका कुठे वापरला जातो, याची शासन दरबारी काहीच नोंद नाही.
गोंदिया जिल्हा कधीकाळी पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जात होता, पण पाणस्थळांच्या दुरवस्थेमुळे पक्ष्यांनीही या जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने अखेर या पाणस्थळांच्या दुरुस्तीकरिता विशेष निधीची तरतूद केली. राजाभाऊ जोग यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्य़ातील पाणस्थळांची दुरवस्था दूर करण्याचा बराच प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्य़ातील केकतपूर या पाणस्थळावर अनेक वर्षांंपासून क्रौंच पक्ष्याचे वास्तव्य आहे. या पाणस्थळाने त्याचे अस्तित्व टिकवून ठेवल्याने जैवविविधता मंडळाकडून त्याला विशेष दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेल्या महाराष्ट्रातील पाणस्थळांचे अस्तित्व अबाधित राखण्याकरिता वनखात्याने यावर्षी प्रथमच राज्यभरात पाणपक्षी गणना घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील काही जिल्ह्य़ात त्याला प्रतिसाद मिळाला, तर अमरावतीसारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेल्या जिल्ह्य़ात मात्र ही गणनाच घेण्यातच आली नाही. अनेक जिल्ह्य़ात हीच परिस्थिती असल्याने पाणस्थळांच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.