News Flash

वसई-विरारमध्ये पाण्याचे स्रोत प्रदूषित

गोखिवरेतील कचराभूमी नागरिकांसाठी त्रासदायक

गोखिवरेतील कचराभूमी नागरिकांसाठी त्रासदायक

विरार : वसई-विरार महापालिकेच्या गोखिवरे येथील कचराभूमीतील कचरा पावसात कुजू लागल्याने येणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याचे स्रोतही प्रदूषित झाले आहे. पालिकेने कचराभूमीतील पाणी जाण्यासाठी नाले तयार केले असले तरी तो नाला नदीत सोडला जात असल्याने नदीचे पात्र प्रदूषित होत आहे.

वसई-विरार शहराची कचराभूमी (डंपिंग ग्राऊंड) गोखिवरे येथे आहे. या कचरा भूमीवर दररोज शहरातील ७०० टन कचरा आणून टाकला जात आहे. ही कचराभूमी परिसरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप सुरू नसल्याने कचऱ्याचे मोठे ढीग साचत आहेत. एरवी कचऱ्याची दुर्गंधी येत असते. आता पावसात हा कचरा कुजून ते पाणी गोखिवरे, भोयदापाडा आदी परिसरातील रस्त्यावर येत असते. या दूषित पाण्यामुळे रोगराई तर पसरतेच शिवाय येथील बोरिंग, विहारी आणि नाले दूषित होत आहेत.

भोयदापाडा, सातिवली, राजावली, वालीवच्या आसपासचा संपूर्ण परिसरातील पाण्याचे स्त्रोत बाधित झाले आहेत. अनेकांच्या विहिरी, बोरिंग तसेच बावखल यांचे पाणी गटारात रूपांतरीत झाले आहे. यामुळे या परिसरात  नागरिक सतत आजारी पडत आहेत.

मागील वर्षी पालिकेने पाणी जाण्यासाठी नाला तयार केला आहे. या नाल्यामुळे कचराभूमीतून निघणारे पाणी नाल्यावाटे न थांबता निघून जाईल. मात्र हा नाला तुंगारेश्वर नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होईल असे स्थानिक नागरिक काकासाहेब मोटे यांनी सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली आहे.

मुसळधार पाऊस पडल्यानंतर या भागाची काय अवस्था होईल, ते दिसेल असे ते म्हणाले. कचरा भूमीतून येणारे पाणी दुर्गंधीयुक्त असते त्यामुळे रोगराई पसरू लागली आहे, असे स्थानिक रहिवाशी जयकिशन गुप्ता यांनी सांगितले.

या परिसराची पाहणी  केली जाईल. पाणवठे निर्जंतुक आणि सफाई केले जातील. पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था केली जाईल.

– किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 3:12 am

Web Title: water sources polluted in vasai virar zws 70
Next Stories
1 राजगृह तोडफोड प्रकरण: नेत्यांनी नोंदवला निषेध
2 मालेगावची धाकधूक पुन्हा वाढली
3 कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
Just Now!
X