करोनामुळे सुमारे ४ ते ५ महिने संपूर्ण देश ठप्प होता. हळूहळू लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आल्यावर लोकं घराबाहेर पडू लागली. सुरूवातीच्या काळात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांना केवळ पार्सल सेवा पुरवण्यास परवानगी होती. त्यानंतर पर्यटन व्यवसाय लक्षात घेता राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये सामाजिक अंतर पाळून खानपान आणि वास्तव्याच्या सुविधांना परवानगी देण्यात आली. पण राज्यातील जलक्रीडा (Water Sport) प्रकार अद्याप बंद आहेत. हे जलक्रीडा प्रकार पुन्हा सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रिडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जलक्रीडा (Water Sport) व्यावसायिकांच्या व्यथा मांडत या व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबतचे निवेदन दिले. अस्लम शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडेसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रिडा व्यवसायाशी (Water Sport) निगडीत विविध परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.

अस्लम शेख म्हणाले की, महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रांमध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारचा बंदरे विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वाढावा, यासाठी विविध योजना राबवण्यात येतील.