चार दिवसांत पाण्याची मोठी आवक

सांगली : जिल्ह्य़ातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी पाण्याची आवक मोठी असल्याने चांदोली धरणातील पाणीसाठा चार दिवसांतच ५० टक्क्यांजवळ पोहोचला. कोयना, चांदोली, उरमोडी या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा नदीतील आयर्वनि पुलाजवळ पाण्याची पातळी २० फुटांवर स्थिरावली आहे. जिल्ह्य़ात जोर नसला तरी पावसाच्या सरी थांबून थांबून कोसळत आहेत.

आज सकाळी आठ वाजता संपलेल्या तासामध्ये जिल्ह्य़ात सरासरी १८.९ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा तालुक्यात ३०.३ मिलीमीटर झाली. अन्य तालुक्याच्या ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस असा मिरज २४.६, जत ८.३, खानापूर १८.८, वाळवा २०.९, तासगाव ११.९, आटपाडी ११.५, पलूस १४.६ आणि कडेगाव २२.३ मिलीमीटर.

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ५२ मिलीमीटर पाऊस गेल्या २४ तासांत नोंदला गेला. पाण्याची आवक वाढली असून गेल्या चार दिवसांत धरणातील पाणीसाठा १६.९० टीएमसी झाला आहे. धरणाची क्षमता ३४.४० असून ४९.१३ टक्के धरण भरले आहे. कोयनेतून २१००, चांदोलीतून १६०५, राधानगरीतून १३००, दूधगंगातून १२०० आणि उरमोडी धरणातून २२७४ क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी २० फुटांवर स्थिरावली असून यामध्ये तत्काळ घट येण्याची चिन्हे नाहीत.