06 December 2019

News Flash

पाण्यासाठी कोरड्या नदीपात्रातील खड्ड्यांचा आधार

गावकऱ्यांनी नदीत खड्डा करून झरा काढला. त्यातील गढूळ पाण्यावरच गाव तहान भागवत आहे.

मोझरी येथील नदीच्या झऱ्यातून पाणी गोळा करताना लहान मुली.

मोहन अटाळकर

गढूळ पाण्यावर गुजराण, मेळघाटातील वाडय़ा, वस्त्यांमधील भीषण वास्तव

चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना रम्य वाटत असले तरी येथून हाकेच्या अंतरावर असलेले मोझरी गाव भीषण जलसंकटाशी झुंजत आहे. सुमारे ७०० लोकवस्तीच्या या गावातील विहीर आटली, हातपंपही कोरडे पडले. अखेर गावकऱ्यांनी नदीत खड्डा करून झरा काढला. त्यातील गढूळ पाण्यावरच गाव तहान भागवत आहे.

मेळघाटातील दुष्काळझळांचे हे प्रातिनिधिक उदाहरण. नदीत खड्डा करून त्यातील पाणी पिण्याचा आदिकाळात घेऊन जाणारा हा प्रकार मेळघाटातील अनेक गावांमध्ये दिसतो. मेळघाटातील दुष्काळ वर्षांगणिक तीव्र होत आहे.

हा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांचा. चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. पण यंदा स्थिती गंभीर आहे. कारण पाऊसच कमी झाला आहे. चिखलदरा तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १७१४ मि.मी. पण गेल्या पावसाळ्यात १००६ मि.मी. पाऊस झाला. वर्षभरात केवळ ६४ दिवसांचा पाऊस. धारणी तालुक्यात १२७० मि.मी. च्या तुलनेत ५० दिवसांमध्ये केवळ ९२७ मि.मी. पाऊस पडला. पावसाचे पाणी डोंगरउतारावरून वाहून जाते. जिल्ह्यातील इतर भागाला त्याचा फायदा होतो, पण मेळघाटातील वाडय़ा, वस्त्या तहानलेल्याच असतात.

पाणी अडवण्याचे आणि साठवणुकीचे कोणतेही मार्ग नाहीत. पावसाळा संपला की भूजल पातळी खालावत जाते. विहिरींमधील पाणी आटले की, नदीनाल्यांमध्ये झरे खोदून पाणी शोधावे लागते. काही भागांत वाळूचा मोठय़ा प्रमाणावर उपसा झाल्याने नद्यांमधील झऱ्यांनाही पाणी लागत नाही. मग पाण्यासाठी वणवण करावी लागते.

मोझरी गावातील बहुतांश लोक पशुपालन करणारे. घरातल्या माणसांबरोबरच जनावरांसाठीही पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ अनेक गावकऱ्यांवर आली आहे. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला नाही. परिणामी गावातील एकमेव विहीर आटली. हातपंप कोरडे पडले. गावकऱ्यांनी मग नदीत झरे खोदले. त्या ठिकाणी पाइपचे तुकडे लावले. त्यात जमा झालेले पाणी काढण्यासाठी आता गावातील महिला आणि लहान मुले भल्या पहाटेपासूनच कामाला लागतात.

चिखलदरा तालुक्यातील आडनदी, भिलखेडा, मनभंग,पाचडोंगरी, कायलारी, धरमडोह, बहाद्दरपूर, सोनापूर, पिपाधरी, सोमवारखेडा, खिरपाणी या गावांचीही अशीच स्थिती आहे. अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली आहे. या बारा गावांमध्ये टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आहेत. ज्या गावांमध्ये टँकर पोहचू शकणार नाही, त्या ठिकाणी बैलगाडीतून पाणी पोहचवावे लागणार आहे.

धुळघाट रेल्वे, बैरागड, माखला यासारख्या गावांतही पाणीटंचाईने लोक त्रस्त आहेत. मेळघाटातील बहुतांश गावांमधील पुरुषवर्ग कामाच्या शोधासाठी गावाबाहेर गेला आहे. मग, पाणी आणण्याची जबाबदारी महिला आणि लहान मुलांवर आली आहे. वर्षांनुवर्षे हे दुष्टचक्र कायम आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

गडगा, सिपना, खंडू, खापरा नद्या कोरडय़ा

धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे उग्र रूप दिसू लागले आहे. गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांची पात्रे अनेक ठिकाणी कोरडी पडू लागली आहेत. अनेक गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पेयजलासाठी टाक्या उभारण्यात आल्या. पण पाण्याचे स्रोत आटल्याने हे जलकुंभ शोभेचे बनले आहेत.

मेळघाटात ‘मनरेगा’मार्फत अनेक कामे हाती घेतली जातात, पण त्यातून पाणी पुरवठय़ाविषयी शाश्वत कामे करण्याचे नियोजन आढळत नाही. जलसंधारणापासून ते पाण्याच्या साठवणुकीच्या कामांकडे लक्षच दिले गेले नाही. पावसाळ्यात पाण्याबरोबर मातीही वाहून जाते. चेकडॅम उभारणे, त्यातील गाळ नियमितपणे काढणे, वृक्षारोपणाच्या माध्यमातून धूप थांबवणे आणि शाश्वत जलस्रोत तयार करणे, या कामांकडे लक्ष द्यायला हवे.

– पूर्णिमा उपाध्याय, सामाजिक कार्यकर्त्यां, मेळघाट

First Published on April 21, 2019 1:06 am

Web Title: water streams of dry rivers
Just Now!
X