बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात रासायनिक टँकर किंवा कूपनलिकेतून पाणी घेण्यावर बंदी असताना अजूनही चोरटय़ा मार्गाने रासायनिक टँकरमधून  पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. याबाबत तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तारापूर येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया क्षमता मर्यादित असल्याने औद्योगिक क्षेत्रात पाणी कपात करण्यात आली आहे,  असे असतानादेखील चोरटय़ा मार्गाने काही कारखानदार रात्रीच्या वेळी येथील टँकर माफियांकडून पाणीपुरवठा करण्याचे काम करुन घेतात. हा प्रकार कोणाच्या निदर्शनास येऊ नये, यासाठी शक्कल लढवत   टँकर माफिया रासायनिक  द्रव्यपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये पाणी भरून ते कारखान्यात पोचवत असल्याचे सांगण्यात येते.  अशांविरुद्ध ठोस कारवाई करावी करणे आवश्यक असतानाही त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

नागरिकांनी तक्रार केल्यानंतरदेखील अधिकाऱ्यांनी एकाही टँकरवर आजवर ठोस कारवाई केली नाही.

टाळेबंदीच्या काळात औषधनिर्मिती रसायन उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात असाच प्रकार उघडकीस आला होता.   परंतु त्या कारखान्याला  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून फक्त नोटीस बजविण्यात आली. मात्र, कारवाई काही केली नाही, असेच असेच प्रकार येथे होत असल्याने याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची उदासिन भूमिका दिसून येते, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

औद्योगिक क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सेवेत ठेवले आहे. रात्रीच्या वेळेतही देखरेख ठेवली जाते. रासायनिक टँकरने पाणीपुरवठा होण्याचा  प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल.

 राजेंद्र अनासने, उपअभियंता महाराष्ट्र

औद्योगिक विकास महामंडळ, पाणीपुरवठा विभाग, तारापूर