विविध प्रतिनिधींकडून

राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठा कमालीचा आटल्याने अनेक जिल्ह्य़ांत पुन्हा एकदा टँकरराज्य येणे अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे. मराठवाडय़ात २३०४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विदर्भातील बुलढाणा व अमरावती जिल्ह्यंतील काही गावांमध्ये आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह नगर, जळगाव हे जिल्हे दुष्काळात होरपळत असून विभागात सुमारे ३३०० गाव-वाडय़ांना ८०० पेक्षा अधिक टँकरने पाणी पुरवठा होत आहे. टँकरची सर्वाधिक संख्या नगरमध्ये असून नंतर अनेक लहान-मोठी धरणे सामावणाऱ्या नाशिकचा क्रमांक आहे.

विदर्भ

विदर्भातील जलसाठय़ाची स्थिती यंदा गंभीर असून अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात कमी पाणीसाठा अतिशय कमी शिल्लक आहे.  अमरावती विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अशा ५०२ प्रकल्पांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा उरला आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील १०५ प्रकल्पांत केवळ सात टक्केच पाणीसाठा उरला आहे. ९१ लघु प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. पूर्व विदर्भातील पाणीसाठय़ाची स्थिती देखील गंभीर आहे. सहा जिल्ह्यंतील मोठय़ा, मध्यम आणि लघु धरणांमध्ये सध्या २७.०२ टीएमसी पाणीसाठा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दिना धरणाची पाण्याची पातळी मृत साठय़ापर्यंत पोहोचली आहे. नागपूर विभागातील १६ मोठय़ा प्रकल्पात १४ टक्के,  ४२ मध्यम प्रकल्पात १९ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाडा

मराठवाडय़ातील ११ मोठय़ा बंधाऱ्यांमध्ये केवळ एक टक्का पाणी शिल्लक आहे. औरंगाबादला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण उणे ४० एवढे खाली गेले असून आता मृत साठय़ातून पाणी उचलले जात आहे.

परभणी जिल्ह्य़ातील येलदरी, निम्नदूधना, हिंगोली जिल्ह्य़ातील  सिद्धेश्वर, बीड जिल्ह्य़ातील माजलगाव, मांजरा या धरणांमधील पाणीसाठा शून्याहून खाली गेला आहे. मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्पांमध्ये किंचितसेही पाणी शिल्लक नाही. त्यामुळे गावोगावी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.  औरंगाबाद शहरातील काही भागांना आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३० प्रकल्प कोरडे झाले असून ३१ प्रकल्पांतील पाणी जोत्याच्या खाली आहे. ११ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्य़ांपेक्षा कमी पाणी आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी २९० प्रकल्प पूर्णत: कोरडे असून ३०७ प्रकल्पांमधील पाण्याची पातळी जोत्याच्या खाली आहे. छोटय़ा प्रकल्पातील २५ टक्के पाण्यात जनावरांना पाणी देता येईल का, अशी चिंता ग्रामीण भागात आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्टात नाशिक जिल्ह्य़ात पाणी पुरवठय़ासाठी सुमारे ४२५ विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे. ग्रामीण भागांत बिकट स्थिती असतांना दुसरीकडे जळगाव शहरात सात, तर धुळ्यात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मनमाड शहरात २५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. अहमदनगर जिल्ह्य़ात भयावह चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्य़ात ३९७ गावे आणि २२०६ वाडय़ांना टँकरने पाणी दिले जात आहे. त्यासाठी ७१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्राला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आणि मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   भीमा खोऱ्यात पिंपळगाव जोगे, वडज, घोड, विसापूर, कळमोडी, वडीवळे, कासारसाई, टेमघर, नाझरे ही नऊ धरणे रिकामी झाली आहेत. तर, माणिकडोह, येडगाव, डिंभे, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर या धरणांमध्ये प्रत्येकी एक ते दीड अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.  सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणात उणे २८.९९ टक्के एवढा पाणीसाठा उरला आहे. कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरण असलेल्या कोयना धरणात ५१ टक्के पाणीसाठा आहे. धोम, कण्हेर, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, तुळशी, कासारी, पाटगाव, उरमोडी आणि तारळी या धरणांमध्ये ३० ते ४० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. तर, येरळवाडी धरण पूर्ण रिकामे झाले आहे.