येत्या आठपंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास जिल्हय़ात टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. अधिका-यांनी टंचाई निवारण्यासाठी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री मधुकर पिचड यांनी दिली. सर्व धरणांतील पाणीसाठे आता पिण्यासाठी राखून ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हय़ातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पिचड यांनी आज, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हय़ात सध्या २१५ गावे व ९८८ वाडय़ावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चारापिकांचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. सध्या ७ हजार हेक्टरवर कृषी विभागाने मका लागवड केली आहे.
मुळा धरणातील साठाही नगर शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच आहे. भंडारदरा धरणातील साठा संपला आहे. निळवंडेत केवळ ४०० टीएमसी साठा शिल्लक आहे. निळवंडय़ातून श्रीरामपूरला केवळ पिण्यासाठी आवर्तन सोडले आहे, हे शेवटचेच आवर्तन राहील. घोडचे पाणी सीनात सोडण्याची मागणी होत आहे, त्यासाठी जिल्हाधिका-यांना संबंधित अधिका-यांची बैठक घेण्यास सांगितले आहे. आता सर्वच धरणांतील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. शेतीसाठी पाणी दिले जाणार नाही, असे पिचड म्हणाले.
जिल्हय़ाला टंचाई नवीन नाही. सरकारी यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांची तयारी व मानसिकताही झाली आहे. यंत्रणा आपत्तीला तोंड देण्यात कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास मागील वर्षीसारखीच गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यासाठी आपण पुन्हा सोमवारी नगरमध्ये तालुका पातळीवरील अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.