सावंतवाडी (मळगाव) रोड रेल्वे टर्मिनसला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हा पाणीपुरवठा नियोजित मणेरी ते वेंगुर्ले मार्गावर जाणाऱ्या योजनेतून केला जाईल. त्यामुळे इन्सुली व मळगावलादेखील पाणीपुरवठा होऊ शकतो, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना व्यक्त केला.
सावंतवाडी (मळगाव) रोड रेल्वे टर्मिनस उभे राहत आहे. तेथे गाडय़ांना पाणी भरण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन केले होते. आता या टर्मिनसचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे पाणी सुविधा निर्माण करण्याची गरज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
सावंतवाडी रोड टर्मिनससाठी सर्वानी केलेल्या संघर्षांला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी साथ दिली. त्यांच्यामुळे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता या टर्मिनसस्थळी पाणीपुरवठा करण्याची जबाबदार शासनाची पर्यायी आमची आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना आराखडा बनविला जात असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
मणेरी, नदीवरून पाणी डेवगे, बांदा, ते सातार्डा-वेंगुर्लेपर्यंत नेणारी योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत नेण्यात येणाऱ्या लाइनवर बांदा किंवा शेर्ले येथून पाणी पाइपलाइनने इन्सुली-मळगाव मार्गे टर्मिनसपर्यंत नेण्यात येणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
इन्सुली व मळेगाव ग्रामपंचायतीने मागणी केल्यास त्यांनादेखील पाणी देण्याचा विचार शासन करील, असा विश्वासदेखील पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी टर्मिनसवर पाणीपुरवठा करावाच लागेल, तसे केले तरच पाणी भरण्यासाठीदेखील रेल्वे गाडय़ा थांबतील, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.