आटपाडीत लवकरच दोन चारा छावण्या

सांगली : सांगली जिल्ह्य़ात उन्हाची तीव्रता वाढेल तसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.  जिल्ह्य़ात साडेतीन लाख लोकांना तहाण भागविण्यासाठी सध्या टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. १७२ गावे आणि १ हजार वस्तीसाठी सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.  येत्या आठ दिवसांत आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्याही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, आजच्या घडीला जिल्ह्य़ातील १७२ गावे आणि एक हजार ७१ वाडीवस्तींवरील  ३ लाख ५६ हजार ९८८ लोकांना पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या आठवडय़ात आणखी दहा गावे आणि ६० वाडय़ांना टँकर सुरू करावा लागणार आहे.

पावसाने दडी मारल्याने यंदा दुष्काळी भागात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. डिसेंबरअखेर जिल्ह्य़ातील ४१ गावांमध्ये २९ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. जानेवारीपासून ही संख्या दुपटीने वाढली. मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

सध्या जत तालुक्यातील ८६ गावे आणि ६५० वाडय़ा, आटपाडी तालुक्यातील २६ गावे आणि २१६ वस्त्या, खानापूर तालुक्यातील १२ गावे व एक वाडी, तासगाव तालुक्यामध्ये २२ गावे आणि ९२ वाडय़ा तर मिरज तालुक्यातील ८ गावे व १६ वस्त्या अशा १७३ गावे आणि १ हजार ७१ वाडय़ा यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सुमारे ३ लाख ५६ हजार ९८८ लोकांची तहान आज टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे.  महिनाअखेर आणखी दोन लाख लोकसंख्येला टँकरचे पाणी पुरवावे लागणार आहे.

पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत असून पशुधन वाचविण्यासाठी आटपाडी तालुक्यात तडवळे आणि आवळाई येथे प्रत्येकी एक अशा दोन चारा छावण्या येत्या आठ दिवसात सुरू करण्यात येतील असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले. जत तालुक्यातून लोहगाव आणि अंकले येथून चारा छावणीची मागणी आली आहे. तेथे पडताळणी करून याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. ज्या ठिकाणी चारा छावणीची गरज आहे त्या ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

दुष्काळी भागात सुमारे तीन ते साडेतीन लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्य़ात पुढील चालू  महिना पुरेल इतपतच चारा उपलब्ध आहे. पशुधन वाचविण्यासाठी मिळेल तेथून चारा उपलब्ध करण्याचे शेतकरी वर्गाचे प्रयत्न सुरू असून चारा छावण्या कधी सुरू होतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.