अमरावती : पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेल्यावरही राज्यात सुमारे १ हजार ८७८ गावे आणि ६ हजार २११ वाडय़ांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे कटू वास्तव समोर आले आहे. घटलेली भूजल पातळी, जल पुनर्भरणाच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव यामुळे राज्यातील एकत्रित पावसाने सरासरी ओलांडली असूनही हजारो गावे तहानलेली आहे.

सध्या राज्यात पाणीपुरवठय़ासाठी २ हजार ३९१ टँकर वापरले जात आहेत. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत टँकरची संख्या ३६३ ने वाढली असून ऑगस्टपर्यंत टँकरचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जाण्याचा अलीकडच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. औरंगाबाद विभागात टँकरची संख्या गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत ६६० ने वाढली आहे. औरंगाबाद विभागात सर्वाधिक १०९० टँकर आहेत. पुणे विभागात ६५४, नाशिक विभागात ५९८, तर अमरावती विभागात ४९ टँकरने पाणीपुरवठा होत आहे, नागपूर आणि कोकण विभागात सध्या एकही टँकर सुरू नाही, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सूत्रांनी दिली. भूजलसाठा वाढवण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात असल्या, तरी अनेक भागात भूजल पातळी फारशी वाढू शकलेली नाही. पाणीटंचाईच्या

सावटाखालील गावांची संख्या वाढली. सरकारी निकषांनुसार नागरी भागात ९० लिटर प्रति व्यक्ती तर ग्रामीण भागात ४० लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा होणे अपेक्षित असते. मात्र ज्या भागात अपेक्षेपेक्षाही ५० टक्के कमी पाणी उपलब्ध होते, ते गाव टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केले जाते. पावसाळ्यात तरी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये, अशी अपेक्षा असते. पण यंदा ऑगस्ट महिना उजाडूनही टँकरच्या संख्येत घट झालेली नाही. पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये ऑक्टोबर ते जूनपर्यंत प्रत्येक तिमाहीत कृती आराखडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केले जातात. मात्र, मुळातच स्रोत कमी होत चालल्याने गंभीर स्थिती उद्भवली आहे. जलस्वराज्य आणि महाजल योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या हजारो पाणीपुरवठा योजनादेखील असक्षम ठरल्या आहेत.

२९ तालुक्यांमध्ये उपसा

’भूजलसाठय़ाचा अतिरिक्त उपसा नियंत्रणात आणण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना सापडलेली नाही. भूजल विभागाच्या पाहणीनुसार राज्यातील २९ तालुक्यांमध्ये प्रचंड उपशामुळे भूजल पातळी कमालीची घटली आहे.

’भूजल साठय़ाच्या ७० टक्क्यांहून कमी उपसा होत असेल, तर तो साधारण मानला जातो, पण काही भागात तो १०० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यात राज्यातील पंचवीस तालुक्यांचा समावेश आहे.

’गेल्यावर्षी याच कालावधीत राज्यात ५२१ गावे आणि ३०७ वाडय़ांमध्ये ५३६ टँकरने पाणी पुरवण्यात येत होते. यंदा ही संख्या चौपटीहून अधिक आहे.