जिल्ह्य़ातील आष्टीसह ९ तालुक्यांत पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी आजही ४५८ गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ३६५ गावांमध्ये १४० विहिरींचे, तर ३१५ बोअरचे अधिग्रहण केल्यामुळे पावसाळय़ातही पिण्याच्या पाण्यावर पाण्यासारखाच पसा खर्च करावा लागत आहे.
पावसाळा सुरू होऊन सव्वामहिना लोटला. मात्र, जिल्हय़ात चांगला पाऊस बरसलाच नव्हता. पंढरपूरची वारी फिरण्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे आगमन होऊन दोन दिवसांत सर्वत्र चांगला पाऊस झाला. पाऊस सुरू झाला असला, तरी तलावातील पाणीसाठा व पाणीपातळी वाढण्यास आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या १७६ गावे व २८२ वाडय़ांची तहान टँकरच्या पाण्यावरच भागवावी लागत आहे. टँकरच्या प्रत्येक दिवसाला तब्बल ५३० खेपा होत असून, सर्वाधिक ९७ टँकर आष्टी तालुक्यात, तर बीड तालुक्यात ४५ टँकर सुरू आहेत. माजलगाव, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यांत टँकर नाही.
इतर ९ तालुक्यांत मात्र टंचाईग्रस्त गावांसाठी टँकर सुरू केले आहेत. जिल्हय़ातील ३६५ गावांमध्ये १४० विहिरींचे, तर ३१५ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाऊस सुरू झाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.