जिल्ह्य़ातील १०६ गावे व ३५ वाडय़ांना १२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाच्या तीव्रतेसोबतच पाणीटंचाईची गावे व टँकरची संख्या वाढत आहे.
जालना ११, बदनापूर २८, भोकरदन ७, जाफराबाद ५, परतूर ४, मंठा ५, अंबड ४५ व घनसावंगी २० याप्रमाणे तालुकानिहाय टँकरची संख्या आहे. मात्र, टँकर भरण्यासाठी अनेक ठिकाणी सार्वजनिक स्रोतांचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे टँकर भरण्यासाठी जिल्ह्य़ात अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या खासगी विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. टँकर भरण्यासाठी, तसेच पाणीपुरवठय़ाच्या अन्य उपायांसाठी जिल्ह्य़ात आतापर्यंत २५० खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.
अंबड व घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाईची गावे, तसेच टँकरची संख्या अधिक आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात एकूण ११० खासगी विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. जालना तालुक्यात ६२, तर बदनापूर तालुक्यात ४३ खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. भोकरदन ६, जाफराबाद ५, परतूर १४, मंठा ९ याप्रमाणे अन्य तालुक्यातील अधिग्रहीत खासगी विहिरींची संख्या आहे. टँकरशिवाय नळयोजनांची विशेष दुरुस्ती, हातपंप दुरुस्ती आदी उपाययोजनाही करण्यात येत आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्ह्य़ात अपेक्षित पावसाच्या तुलनेत जवळपास ५५ टक्के, तोही अतिशय अनियमित पाऊस झाला. त्याचा परिणाम तलावांमध्ये कमी पाणी साठण्यात झाला. नद्याही पूर्ण भरून वाहिल्या नाहीत. विहिरी व हातपंपांची पाणी पातळी खोलवर गेली असून उन्हाच्या तीव्रतेसोबत पिण्याच्या पाण्याचे स्रोतही कोरडे पडण्याचे प्रमाण वाढले आहे.