राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता चौपदरीकरण दरम्यान खोदकाम करताना जलवाहिनी फुटली

चंद्रपूर : एमईएल ते बंगाली कॅम्प येथील रस्ता चौपदरीकरणा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खोदकाम करताना शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फोडल्याने गेल्या ८ ते १० दिवसांपासून संजयनगर, कृष्णनगर, पत्रकार नगर, इंडस्ट्रियल वार्ड, विवेक नगर, सरकार नगरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पूर्वीच एका दिवसाआड नळाला येणारे पाणी मागील दहा दिवसांपासून येत नसल्याने नागरिक प्रचंड रोष व्यक्त करीत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मूल रोड ते बंगाली कॅम्प मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच भागातून सावरकर चौक ते बंगाली कॅम्पपर्यंत जुनी जलवाहिनी गेली असून संजय नगर, कृष्ण नगर, पत्रकार नगर, इंडस्ट्रियल वार्ड, विवेक नगर, सरकार नगर इत्यादी भागात पाणीपुरवठा केला जात होता. तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेची नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत महापालिकेने महामार्ग प्राधिकरणाला अवगत केले होते. मात्र, प्राधिकरणाने निष्काळजीपणाने खोदकाम करून मुख्य जलवाहिनी फोडून ठेवली आहे.

महापालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता मत्ते, ए.सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधींची एक बैठक घेऊन महापालिकेशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना आयुक्त संजय काकडे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर मात्र, प्राधिकरणाने कुठलीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी क्षतिग्रस्त केली. समन्वयाच्या सूचना दिल्या असतानासुद्धा प्राधिकरणाने निष्काळजीपणामुळे शहरातील पाणीपुरवठा दहा दिवसापासून ठप्प झाला आहे. त्यामुळे एका दिवसाआड येणारे पाणी आता दहा दिवसापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.