तहानलेल्या लातूरकरांसाठी मिरजेतून रेल्वेने कृष्णा नदीचे पाणी देण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. आठ दिवसांत या आदेशाची कार्यवाही होणार आहे. खडसे मंगळवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाणी देण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे या बैठकीला भाजपचे सांगलीतील खासदार, आमदार, शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अनुपस्थित होते.
मिरजेजवळ कृष्णेचे पाणी उपलब्ध आहे. तसेच मिरजेत रेल्वेची स्वतंत्र पाणी योजना आणि पाणी भरण्याची सुविधाही आहे. या साऱ्यांचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरसाठी मिरजेतून पाणी पाठविण्यास अनुकूलता दर्शवली होती.
लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीही नजीकच्या भागात स्रोत उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. टॅंकर भरण्यासाठीही जिल्ह्यामध्ये पाणी उपलब्ध नाही. याचे परिणाम वैद्यकीय व्यवसायाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झाले आहेत. स्थानिक पातळीवर पाणी उपलब्ध होत नसल्याने रेल्वेने पाणी पुरविण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.