पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी वाया; नद्या कोरडय़ाठाक होण्याची शक्यता

रमेश पाटील, वाडा

डोळ्यासमोर भीषण पाणीटंचाई दिसत असतानाही राज्य सरकारच्या लघुपाटबंधारे विभाग आणि पालघर जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाडा तालुक्यातील पाणी वाया जात आहेत. वाडा तालुक्यात पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोकण टाइप आणि कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. २५हून अधिक बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे असल्याने पाणी वाहून जात असून त्याचा तालुक्यातील शेतकरी आणि जनतेला फायदा होत नाही. नद्या कोरडय़ाठाक झाल्यानंतर प्रशासन लक्ष देणार का, असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.

यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. वाडा तालुक्यात दरवर्षी पावसाची सरासरी तीन ते साडेतीन हजार मिलिमीटर असते. यंदा मात्र १५ ऑक्टोबपर्यंत केवळ २०७६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात आहे. त्यामुळे तालुक्यातील लहान-मोठे नाले, नद्यांमधील पाण्याची पातळी अतिशय कमी होऊ लागली आहे.

वाडा तालुक्यात वैतरणा, तानसा, पिंजाळी, देहर्जा आणि गारगाई या पाच नद्या आहेत. या नद्यांवर पाटबंधारे विभागाच्या वतीने २७ कोकण टाइल बंधारे बांधलेले आहेत. यातील अनेक बंधाऱ्यांचे काम निकृष्ट असल्याने पाणी अडवूनही डिसेंबर अखेपर्यंत खडखडाट होतो. काही बंधाऱ्यांवर तर दुरुस्तीच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केला जात आहे. मात्र तरीही त्याचा फायदा होत नाही. तालुक्यातील १५ बंधाऱ्यांचे दरवाजे नेहमी उघडे असतात. त्यामुळे पाणी अडले जात नसून या दरवाजांतून वाहून जाते. तालुक्यातील विविध नाल्यांवर जिल्हा परिषद अंतर्गत वाडा पंचायत समितीने ३५० सिमेंट बंधारे बांधले आहेत. मात्र या बंधाऱ्यांचा उपयोग झाला नाही. या बंधाऱ्यांमुळे पाणीच अडले नसल्याचे चित्र आहे. पंचायत समितीच्या पाटबंधारे विभागाने ही जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतींवर सोपवली. मात्र निधी आणि मजूर मिळत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींनी याकडे दुर्लक्ष केलेले आहे.

धरणांची पाणीपातळी कमी

गारगाई व पिंजाळी या दोन नद्यांची लांबी ७० किलोमीटर असून या दोन्ही नद्यांवर कुठेही मोठे धरण नाही. (मुंबई महानगरपालिकाची पिंजाळी व गारगाई ही दोन मोठी धरणे प्रस्तावित आहेत) सध्या या दोन नद्यांवर धरण नसल्याने सर्व पाणी समुद्रात जाऊन मिळते. तर वैतरणा व तानसा या दोन्ही नद्यांवर असलेल्या मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा या धरणांचे दरवाजे बंद केल्याने या नद्यांची पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे.

बंधाऱ्याची दुर्दशा

तालुक्यातील मौजे पिक येथे गारगाई नदीवर गेल्या २४ वर्षांपूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत कोकण टाइप बंधारा बांधला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम उत्कृष्ट होते. मात्र गेल्या २४ वर्षांत या बंधाऱ्याची देखभाल न केल्यामुळे दुरवस्था होऊ लागली आहे. या बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच बंद केले तर परिसरातील अनेक गावे, पाडे यांना या पाण्याचा फायदा मिळतो. मात्र अजूनपर्यंत जिल्हा परिषदेने त्याची दखल घेतलेली नाही. या बंधाऱ्यातील पाणी निघून चालल्यामुळे येथील म्हसे या आदिवासी पाडय़ाला एका स्वयंसेवी संस्थेने दिलेली पाणी योजना बंद पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून या बंधाऱ्याचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

वाडा येथील अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे नादुरुस्त असल्याने ते नव्याने बसवण्यासाठी ठेकेदारांना कामांचे वाटप केलेले आहे. ही कामे लवकरच सुरू होतील. नाल्यांवरील सिमेंट बंधाऱ्यांचे पाणी अडवण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

– राजकौर पाटील, उपअभियंता

लघू पाटबंधारेअंतर्गत असलेल्या चारही बंधाऱ्यांचे दरवाजे लावण्याचे काम सुरू असून पाणी पातळी जशी वाढत जाईल, तसे दरवाजे बसवण्यात येईल.

– उमेश पवार, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग

वाडा तालुक्यातील पाचही नद्या शेतकऱ्यांसाठी रक्तवाहिन्या आहेत. आमचे रक्त म्हणजे नद्यांतील पाणी डोळय़ांसमोर वाहून जात असताना शासन अजून लक्ष देत नाही. हे आमचे दुर्भाग्य आहे. 

  – दामोदर पाटील, शेतकरी,