महापालिकेचा गलथानपणा
शहरात अनेक वस्त्या पाण्यासाठी तहानल्या असताना टँकरच्या शोधात बायाबापडय़ा व लहान मुलांची वणवण सुरूअसताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाऱ्यातूनच पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड झाले आहे. या बंधाऱ्याला असलेल्या दरवाजांमधून पाणी वाया जात असून दररोज हा अपव्यय अक्षरश: हजारो लिटरचा आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका दंड आकारण्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे स्वत: मात्र गलथान कारभारामुळे पालिका प्रशासन अप्रत्यक्ष पाण्याचा अपव्ययच करू लागले आहे. या अपव्ययाबद्दल कोणी कोणाला दंड आकारायचा, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
परभणी शहर पाणीटंचाईच्या बाबतीत भीषण स्थितीला सामोरे जात आहे. आठ दिवसांतून एकदा पाणी देणार असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेने हा दावाही आता खोटा ठरवला आहे. दुसरीकडे शहरात टँकरचे नियोजनही पूर्ण कोलमडले आहे. नळ नाहीत त्या भागात महापालिकेने टँकरचे नियोजन नीट लावण्याची आवश्यकता असताना शहरातील टँकरची यंत्रणा पूर्ण अपयशी ठरली आहे. त्याच त्या ठिकाणी टँकर उभे केले जातात आणि तेच ते लोक पाण्याचा साठा करतात. तहानलेल्या लोकांना मात्र पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. महापालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंड आकारण्याची मोहीम मध्यंतरी उघडली होती. यात ३० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारणार असल्याचे महापालिकेने सांगितले. त्यानुसार मनपाची काही पथकेही तपासणीसाठी फिरू लागली. मार्चअखेरीमुळे या पथकांनाच वसुलीचे काम लागले. आता घरपट्टी, नळपट्टी शास्ती भरण्याची मुदत १६ एप्रिल केली आहे. त्यामुळे सध्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांबद्दल महापालिका काहीच करीत नसल्याचे दिसते.
नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे महापालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडाची मोहीम सुरूकेली. अशी मोहीम अन्यत्र कुठेच नसल्याने सर्वत्र या मोहिमेचे कौतुकही झाले. प्रत्यक्षात ही मोहीम म्हणजे महापालिकेच्या पोकळ घोषणेपकीच ठरली. कारण हजारो रुपयांचा दंड ज्यांना आकारला त्यातल्या किती लोकांनी महापालिकेला पसे भरले, हे कोडेच आहे. हा दंड म्हणजे केवळ कागदी कारवाई ठरला.
महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा दंड वसुल झाला नसल्याचे कळते. या संदर्भात कर अधीक्षकांना विचारले असता त्यांनीही या बाबत आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगितले. दंड आकारणी करून महापालिकेने आपली जबाबदारी पार पाडली, तरी वसुलीचे काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. आता तर चक्क राहटी बंधाऱ्यातूनच पाण्याची गळती होत असल्याचे उघड झाले आहे. या बंधाऱ्याला असलेल्या सर्वच ४६ दरवाजांमधून सध्या पाण्याची गळती सुरू आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाऱ्यात पाण्याचा साठा जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. पण दररोजच दरवाजांमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने महापालिकेने आधी ही गळती थांबवावी. नंतर परभणीकरांना पाणी बचतीचे महत्त्व सांगावे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.