17 December 2017

News Flash

आज पाणी रोखण्याचा इशारा

भंडारदरा धरणातून आज जायकवाडीसाठी सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा

वार्ताहर, अकोले | Updated: November 30, 2012 5:07 AM

भंडारदरा धरणातून आज जायकवाडीसाठी सहा हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा पाणी सोडतेवेळी धरण परिसरात तैनात करण्यात आला होता. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या घोषणेविरोधात गत काही दिवसांपासून गदारोळ सुरु असला तरी आज पाणी सोडण्यास कोठेही विरोध झाला नाही. उद्या (शुक्रवार) मात्र खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा धरणाचे चाके बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी सव्वा अकरा वाजता भंडारदरा धरणाच्या स्पीलवेची लोखंडी दारे साडेतीन फूट वर उचलण्यात आली आणि धरणातील पाणी नदीपात्राकडे झेपावले. स्पीलवेतून ५ हजार २१२, वीजनिर्मिती केंद्रातून ८३७ व गळतीचे १५ असे ६ हजार ६४ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. मात्र निळवंडे धरण ओव्हरफ्लो होऊन प्रवरेचे पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ होण्यासाठी सायंकाळ उजाडली. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात येते व निळवंडे ओव्हरफ्लो झाल्यानंतर निळवंडेच्या सांडव्यावरुन प्रवरा नदीपात्रात पडू लागते. सकाळी भंडारदऱ्यातून पाणी सोडल्यानंतर काही तासातच सुप्रसिध्द रंधा धबधबा जोमाने कोसळू लागला. निळवंडे धरणातील पाण्याची पातळी हळुहळू वाढू लागली. सायंकाळी निळवंडे धरण काठोकाठ भरले. निळवंडेच्या भिंतीवरुन सहाच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात पाणी पडू लागले. त्याचवेळेला निळवंडेच्या विमोचकातूनही १ हजार ७७५ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली व भंडारदरा निळवंडेच्या पाण्याचा जायकवाडीच्या दिशेने प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. अवघ्या महिनाभरात भंडारदरा-निळवंडे धरणातून दुसऱ्यांदा जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.
भंडारदरा धरणातून पाणी सोडतेवेळी धरणात ८ हजार २८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता तर निळवंडे धरणात ४ हजार ६४३ दशलक्ष घनफूट साठा होता. निळवंडे धरणाची पुर्ण संचय पातळी ४ हजार ७३२ दशलक्ष घनफूट आहे. मात्र निळवंडेत येणारे पाणी धरणाच्या जलाशयात पसरत गेले. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी सुमारे साडेपाच तासांचा कालावधी लागला. सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण ८ हजार २१६ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आले.

First Published on November 30, 2012 5:07 am

Web Title: water will stop today