ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेच्या मागणीसाठी आज(रविवार) जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समजाच्या हक्कांसाठी लोकभेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून, ओबीसींची जनगणना आवश्यक असल्याची मागणी केल्याचे दिसून आले.

“आम्ही देखील याच देशाचे आहोत, आमचीही जनगणना करा…, ओबीसींची जनगणनेची आवश्यकता आणि अनिवार्यता आहे. काही आठवणी आणि काही वचने..” असं पंकजा मुंडेंनी ट्विट केलं आहे.

ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर … – विजय वडेट्टीवार

तसेच, “२०२१ ची जनगणना जातिनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावांमधून निघालेला आवाज राजधानीपर्यंत नक्कीच पोहचणार, याबद्दल काहीच शंका नाही.” असं देखील पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, “एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत. बहुजन कल्याण विभाग मंत्री म्हणून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेली आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी विधानसभेत मांडेल. जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा आहे.” असं विधान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जालन्यात केलं .

यावेळी वडेट्टीवार यांनी या महामोर्चाच्या प्रसंगी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण काढली. आपल्याला लढण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं व त्यांच्या संघर्षाला सलाम देखील केला. मी पक्ष, धर्म, जात-पात सोडून केवळ ओबीसीसाठी लढत असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.